महाड : विकेंडला कोकणात जाण्याचा प्लॅन असेल, तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा! येत्या १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.
किती वेळ असणार बंदी?
१२ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने – उदा. दूध, पेट्रोल, एलपीजी गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला – यांना या बंदीपासून सूट देण्यात आली आहे. तसेच पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन आणि महिला सशक्तीकरणविषयक वाहनांनाही मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचं कारण काय?
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी पुण्यतिथी मोठ्या अभिवादन सोहळ्याने साजरी होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, तसेच इतर मंत्री व हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे.
‘लाँग विकेंड’मुळे मार्गावर होऊ शकते गर्दी
१२ एप्रिल – शनिवार
१३ एप्रिल – रविवार
१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (सार्वजनिक सुटी)
या सलग सुट्यांमुळे अनेक पर्यटक गोव्याकडे किंवा कोकणात जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यामुळे या मार्गावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाची पुर्वयोजना करा!
कोकणच्या दिशेने जाण्याआधी ही माहिती शेअर करायला विसरू नका – अन्यथा रस्त्यावर अडकावं लागेल!