रोम : जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वातील इटलीमध्ये बहुतांश वाहतूकदारांनी (ट्रांसपोर्टर्स) ९ ते १२ एप्रिलदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात विमान कंपन्यांपासून ते रेल्वे अन् खासगी क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला आहे. त्यामुळेच चार दिवस देशभरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेलोनी सरकार हा संप संपवण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बजेट एअरलाइन इझीजेटच्या फ्लाइट असिस्टंटनी ९ एप्रिल रोजी चार तासांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत हा संप चालला. कामगार करार सुधारण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा अयशस्वी झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. इझीजेटने अद्याप कोणतीही उड्डाणे रद्द केलेली नसली तरी, प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांबद्दल माहिती एअरलाइनकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती अन् चीनवर मात्र…
या संपामुळे रेल्वे प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एसआय-कोबास युनियनने १० एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ एप्रिल रोजी रात्री ९ पर्यंत २४ तासांचा रेल्वे संप पुकारला आहे. या गाड्या चालवणारी कंपनी ट्रेनॉर्डने म्हटले आहे की, या संपामुळे प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, काही अत्यावश्यक सेवा सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील.
या संपांमुळे मेलोनी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ कामगार संघटनाच संतप्त नाहीत, तर सामान्य जनताही गैरसोयींमुळे त्रस्त आहे. वाहतूक क्षेत्रातील या अशांततेचा इटलीच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे, विशेषतः देश पर्यटन हंगामाकडे वाटचाल करत असताना हा संप पुकारल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता मेलोनी सरकार या संकटाचा कसा सामना करते आणि प्रवाशांना लवकरच दिलासा मिळतो का हे पाहणे बाकी आहे.