Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखदरारा आणि जिव्हाळा...

दरारा आणि जिव्हाळा…

  • डॉ. सुकृत खांडेकर, मुंबई

माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणे यांची मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद झाली. राणे साहेबांची प्रेस कॉन्फरन्स नेहमीच हाऊसफुल्ल असते. पत्रकार मोठ्या संख्येने येतात. राणेसाहेब बोलणार म्हणजे पहिल्या पानाची बातमी असते, वृत्तवाहिन्यांसाठी अनेकदा ती ब्रेकिंग न्यूज असते. ते हातात महागडे मोबाईल मिरवत फिरत नाहीत, मोटारीतून उतरल्यावर आजूबाजूला जमलेल्यांकडे न बघताच पुढे निघून जाणारे ते नेते नाहीत. त्यांना कोणतेही प्रश्न विचारा, त्यांचे उत्तर सिंघम स्टाइलने असते. पण त्या पत्रकार परिषदेत राणे साहेबांचा मूड वेगळाच दिसला. पत्रकारांशी बोलताना ते भावुक झाल्याचे जाणवले. आजवर ५९ वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. विधानसभेवर सहा वेळा आमदार म्हणून कोकणातील जनतेने त्यांना निवडून दिले. तरुण वयातच शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने ते भारावून गेले आणि कडवट शिवसैनिक झाले. त्यांच्यातील तडफ व कार्यक्षमता बघूनच शिवसेनाप्रमुखांनी त्यांना शाखाप्रमुख केले. नंतर ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक झाले. बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. १९९० मध्येे शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मालवणमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पाठविले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. विधानसभेवर आमदार, नंतर विधान परिषदेवर आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार, केंद्रीयमंत्री, आता लोकसभेत खासदार असा त्यांचा राजकीय जीवनातील दमदार प्रवास आहे. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून आणि शिकवणुकीतून आपण घडलो असे ते नेहमीच अभिमानाने सांगतात. शिवसेनाप्रमुख हे त्यांचे दैवत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अँग्री यंग मॅन अशी नारायण राणे यांची प्रतिमा आजही कायम आहे. मग ते पत्रकारांशी बोलताना एकदम हळवे कसे झाले?

नारायण राणे हे जात-पात-धर्म न पाहता लोकांची सेवा करणारे नेते आहेत. नगरसेवक असल्यापासून म्हणजेच गेली पाच दशके त्यांचा पत्रकारांशी संबंध आहे. पत्रकारांना ते कधीच टाळत नाहीत. जुने पत्रकार भेटले की, त्यांची ते आवर्जून चौकशी करतात. पूर्वीचे राजकारण व आजचे राजकारण खूप बदलले आहे, असे खुल्या मनाने सांगतात. राणे उत्तम वाचक आहेत, त्यांच्याकडे दैनंदिन घडामोडींची अद्ययावत माहिती असते. लहानपणापासून वृत्तपत्रे वाचण्याची त्यांना सवय आहे. सकाळी ९ च्या आत त्यांची दैनिके वाचून झालेली असतात. प्रमुख वृत्तपत्रांतील अग्रलेख ते आवर्जून वाचतात. कधी कधी थेट संपादकांना वा संबंधितांना फोन करून चर्चाही करतात. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘पत्रकारिता व शिक्षण हा पेशा आहे. त्याचे भान राखले पाहिजे. मी आज असेन, उद्या असेन…नसेनही… जाण्यापूर्वी समाजासाठी काही तरी सोडून गेलो आहे, हे पत्रकार मित्रांना माझ्याबद्दल सांगता आले पाहिजे…

नारायण राणे असे का बोलले, याचे कोडे अनेकांना उलगडले नाही. ते कधी असे बोलत नाहीत, मी आज असेन, उद्या नसेन अशी त्यांनी भाषा का वापरली? आज सिंधुदुर्गचा विकास जो दिसतो आहे, त्यात राणेसाहेबांचे मोठे योगदान आहे. पर्यटन जिल्हा करण्यापासून विमानतळ उभारण्यापर्यंत, मोठे इस्पितळ उभारण्यापासून इंजिनीअरिंग-मेडिकल शिक्षणापर्यंत, उत्तम चौपदरी हायवेपासून ते वीज, पाणी मुबलक उपलब्ध देण्यापर्यंत सर्वच बाबतीत नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी झपाटून काम केले. निलेश व नितेश हे दोन्ही पुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन कोकणी जनतेसाठी काम करीत आहेत. दोघांनाही जनतेने विधानसभेत आमदार म्हणून पाठवले आहे. नितेश यांनी मंत्री म्हणून आपल्या कामाचा अल्पावधीत ठसा उटवला आहे.

‘प्रहार’चा संपादक म्हणून माझी राणे साहेबांशी अनेकदा भेट होते व नियमित संवादही होतो. प्रहारमध्ये पहिल्या पानावर मथळा कोणता आहे, कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, अग्रलेख कोणत्या विषयावर आहे, अशी ते विचारणा करतात. प्रसिद्ध झालेल्या अंकातील चुका ते दाखवतात. मथळा कडक पाहिजे, मथळा बघून वाचक आकर्षित झाले पाहिजेत असेही बजावतात. मजकुरातील शुद्ध लेखनात चूक असेल, तर लगेचच ते दाखवतात. माननीय, श्री. सौ. हे शब्द कोणाच्या नावापुढे वापरायचे, यावरही त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांचे अवांतर वाचनही खूप आहे. वाचलेल्या पुस्तकांचा संदर्भ देऊन ते काही नवीन माहिती देतात आणि सूचनाही करतात. वृत्तपत्रांबरोबर अवांतर वाचन असले पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो.

खासदार म्हणून त्यांचा दिल्लीत मुक्काम असला तरी त्यांचे महाराष्ट्रातील घडामोडींवर बारीक लक्ष असते. स्वत: राणेसाहेब राज्यात विधिमंडळात विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांची अर्थसंकल्पावरील अभ्यासपूर्ण व सडेतोड भाषणे ऐकण्यासाठी सभागृहातील सदस्य, गॅलरीत पत्रकार व नोकरशहा यांची गर्दी असायची. त्यांच्या भाषणांवर सरकारला उत्तरे देताना भंबेरी उडायची. तशी भाषणे आता सभागृहात ऐकायला मिळत नाहीत. संपूर्ण राज्यातील प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा आता क्वचितच ऐकायला मिळते. आरोप-प्रत्यारोप, अरेरावी, दुसऱ्याला बोलू न देणे यातच सभागृहाचा आता जास्त वेळ जातो. विधिमंडळात सदस्य असताना नारायण राणे बोलायला उभे राहिले की, सभागृहात कमालीची शांतता पसरत असे. त्यांचे भाषण प्रत्येकजण मन लावून ऐकत असे. आता भाषणाला उभा राहिल्यावर सभागृह शांत होईल असा नेता शोधावा लागतो.

नारायण राणे नेहमीच रोखठोक बोलतात. गुडीगुडी त्यांना बोलता येत नाही. ते रागीट आहेत, असा एक समज आहे. पण काहीतरी चुकीचे घडले म्हणून ते रागावतात ना…त्यांना जे अपेक्षित असते ते लगेचच झाले पाहिजे असा त्यांचा दंडक असतो. प्रत्येक गोष्ट अचूक, वेळेवर झाली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. मी एकदा त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटलो. तेव्हा मला त्यांनी बरेच दिवस फोन केला नाहीस, असे विचारले. आपण माझ्यावर बरेच रागावला होतात, असे मी म्हणताच ते शांतपणे म्हणाले, प्रहार चांगला निघाला पाहिजे, प्रहार गुणवत्तेने दर्जेदार असला पाहिजे म्हणून मी झालेल्या चुकांवर बोलतो… राणेसाहेबांच्या मनात कुणाविषयी कटुता नसते. ते कितीही रागावून बोलले तरी त्यांच्या मनात कुणाबद्दल आकस नसतो.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी त्यांना मुंबईतील जुहू येथील अधिश बंगल्यावर भेटलो, तेव्हा त्यांनी पाऊणतास त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ज्यांनी साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात साथ दिली त्या मित्रांना मी कधी विसरू शकत नाही, असे सांगत काही मित्रांची त्यांनी नावेही घेतली. राणेसाहेब सत्तेच्या परिघातील उत्तुंग शिखरावर पोहोचले, पण कोकणी जनतेला व मित्रांना विसरू शकत नाहीत, हेच मला त्यावेळी जाणवले. त्यांचा जेवढा दरारा आहे, तेवढाच सामान्यांविषयी जिव्हाळा त्यांच्या स्वभावात आहे. संकटात सापडलेल्या सामान्य माणसालाही दिलासा मिळतो, ही जादू त्यांच्या भेटीत आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात केंद्र सरकारने सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मांडले. सर्व पक्षांतील जास्तीत जास्त सदस्यांना सभागृहात चर्चेत भाग घेण्याची मुभा सरकारने दिली. लोकसभेत १३ तासांहून अधिक काळ चर्चा झाली. पहाटे २ वाजता सुधारणा विधेयकावर मतदान घेण्यात आले. मतदानाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर रात्री ३ वाजता मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट जारी करणारा अध्यादेश लोकसभेत पारीत करण्यात आला. पहाटे ३.३० वाजता सभागृहासमोरील बैठकीचे कामकाज संपले. सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे लोकसभेत खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे संपूर्ण काळ लोकसभेत उपस्थित होते. पक्षाने सर्व सदस्यांना हजर राहण्याविषयी व्हीप काढला होता. सकाळी संसद भवनात ते आले व दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता त्यांच्या निवासस्थानी परतले. या काळात ते कोणाचे फोन घेऊ शकत नव्हते, ना कोणाला फोन करू शकत नव्हते. संसदेतील बहुतेक सदस्यांची हीच अवस्था होती. वक्फ सुधारणा विधेयक या एकाच गोष्टीला प्राधान्य होते. मी स्वत: वक्फ विधेयकावरील लोकसभेतील चर्चा टीव्हीवर रात्री उशिरापर्यंत पाहिली. त्या रात्री माझा राणेसाहेबांशी संपर्क होणे शक्यच नव्हते. ते दुसऱ्या दिवशी मुंबईत आले तेव्हा मी त्यांची भेट घेतली. पहाटे ४ वाजेपर्यंत आपण संसदेत होतात, मग जेवण-खाणाचे काय केले, असा प्रश्न मी उत्सुकतेने त्यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या जवळ सुकामेवा होता…

दैनिक प्रहारचे सल्लागार संपादक, नारायण राणे यांना प्रहार (मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे) परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा! 

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -