Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखहिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी नेपाळमध्ये आक्रोश

हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी नेपाळमध्ये आक्रोश

‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा जयघोष काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण ऐकतो. भारत हा हिंदू राष्ट्र व्हावा अशी इच्छा असलेला मोठा वर्ग आपल्या देशात आहे. या हिंदुत्ववादी विचारांच्या आधारावर काम करणाऱ्या भाजपाला केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा सत्ता मिळाली. भारतातील हिंदूंना आपली बाजू ठामपणे मांडणारा पक्ष हवा होता. ती पोकळी भरून काढण्यात भाजपाला यश आले, असे म्हणायला हरकत नाही.त्यातूनच, अयोध्येतील राम मंदिराचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न असो नाही, तर कश्मीरमधील ३७० कलमाचा मुद्दा असो. शेजारील देशांनीही असे ठळक मुद्दे मोदी सरकारच्या कार्यकाळात कसे निकाली निघाले, हे पाहता आले आहे. नेपाळ हा भारताचा शेजारील मित्र राष्ट्र ओळखला जातो. ८१ टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये सध्या सुरू झालेल्या हिंदू राष्ट्राच्या नवीन आंदोलनामुळे त्याला जगभर प्रसिद्धी मिळत आहे. राजेशाही पुन्हा आणावी, हिंदू राष्ट्र घोषित करावे, यासाठी मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरत आहेत. माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांना पुन्हा राजगादीवर बसवावे या मागणीला जोर धरला आहे.

नेपाळमधील २४० वर्षे जुन्या हिंदू राजेशाहीचे अस्तित्व नेपाळ संसदेने २००८ मध्ये समाप्त केले होते. नेपाळला धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले होते. राजे ज्ञानेंद्र शाह यांना परागंदा व्हावे लागले होते. अर्थात हा सर्व प्रकार चीनच्या इशाऱ्यावरून करण्यात आला. भारताचा एक मित्रराष्ट्र कमी करण्याचा चीनचा सुप्त हेतू होता. नेपाळची सत्ता उलटून लावण्यासाठी १९९० सालापासून नेपाळमध्ये धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याची मागणी जोर धरली होती; परंतु ही कार्यकारी राजेशाही उलथून संविधानिक राजेशाहीसह संसदीय लोकशाही स्थापित करण्यासाठी १८ वर्षांचा काळ लोटला गेला.

नेपाळमध्ये हिंदू, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर अनेक धार्मिक समुदाय आहेत. नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथल्या लोकसंख्येत हिंदूंचा टक्का भारतापेक्षा अधिक आहे. या देशात अनेक सुंदर आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे आहेत. नेपाळची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख वाचवण्यासाठी राजेशाही आवश्यक आहे. जनता धर्मनिरपेक्ष सरकारवर खूश नाही, असा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. अनेक पौराणिक कथांशी नेपाळची जनता आजही स्वत:ला जोडू पाहते. एका कथेनुसार, भगवान विष्णूने नेपाळी लोकांना संघटित केले होते आणि त्यांना त्यांचा ध्वज दिला होता, ज्यावर सूर्य आणि चंद्र असे प्रतीक होते. इतिहासकाराच्या मते, नेपाळ या नावाची सुरस कथाही आहे. “ने” नावाच्या एका हिंदू ऋषीने प्रागैतिहासिक काळात काठमांडूच्या खोऱ्यात स्वतःची स्थापना केली. “नेपाळ” या शब्दाचा अर्थ म्हणजे “ने ऋषींनी संरक्षित केलेले स्थान (संस्कृतमध्ये “पाल”)” असा होतो. त्यांनी बागमती आणि विष्णुमती नद्यांच्या संगमावर असलेल्या टेकू येथे धार्मिक विधी केले. पौराणिक कथेनुसार, त्यांनी गोपाल राजवंशातील अनेक राजांपैकी पहिला म्हणून एका धार्मिक गोपाळाची निवड केली. या शासकांनी नेपाळवर ५०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. गोपाल राजवंशाच्या वंशातील पहिला राजा म्हणून भुक्तमानची निवड केली. गोपाल राजवंशाने ६२१ वर्षे राज्य केले. यक्ष गुप्त हा या राजवंशाचा शेवटचा राजा होता. १८ व्या शतकाच्या मध्यात, पृथ्वी नारायण शाह या गुरखा राजाने सध्याचे नेपाळ बनलेले राज्य एकत्र करण्यासाठी मोहीम आखली होती. त्याने सीमावर्ती पर्वतीय राज्यांची तटस्थता सुनिश्चित करून आपले ध्येय गाठले. अनेक रक्तरंजित लढाया आणि वेढा घालण्यानंतर, विशेषतः कीर्तिपूरची लढाई १७६९ मध्ये काठमांडू खोरे जिंकण्यात यश मिळवले होते. हिंदू धर्म हा नेपाळचा सर्वात मोठा धर्म आहे. काठमांडू खोऱ्यावरील गुरखाली विजयानंतर, राजा पृथ्वी नारायण शाह यांनी पाटणमधून ख्रिश्चन मिशनऱ्यांना हाकलून लावले आणि नेपाळला अस्सल हिंदुस्थान असे नाव दिले होते. गुरखाली राजा पृथ्वी नारायण यांच्या काठमांडू खोऱ्यावरील विजयानंतर, उच्च वर्गीकरणाचे हिंदू धागे परिधान केलेल्या तगधारींना नेपाळच्या राजधानीत विशेषाधिकार प्राप्त झाले होते. तसेच केंद्रीय सत्तेतही अधिक सहभाग मिळाला होता. तेव्हापासून हिंदू करण हे नेपाळ राज्याचे महत्त्वाचे धोरण बनले होते. नेपाळी समाज त्याच्या आंतरधर्मीय धार्मिक सौहार्द आणि सहिष्णुतेसाठी ओळखला जात असला तरी पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळच्या हिंदू करणासाठी इतर धार्मिक समुदायांवर छळ केल्याचा इतिहास आहे. त्यानंतर नेपाळमध्ये १९४०पर्यंत हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यास मनाई होती. नेपाळच्या नव्या राज्यघटनेनुसार, तो धर्मनिरपेक्ष राज्य आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला प्राधान्य देत नाही, असा उल्लेख आहे. यामुळेच नेपाळमध्ये धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी झाला नाही, कारण नेपाळच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेची व्याख्या ‘अनादी काळापासून चालत आलेल्या धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणासह धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य’ अशी केली आहे, जी हिंदू धर्माला विशेष स्थान देत आहे. त्यामुळे, राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष राज्याचा दर्जा देत लोकशाही प्रक्रियेतून सरकार स्थापन करण्यात येत असले तरी जनतेला राजेशाहीचा मुकुट हवा आहे. त्याचबरोबर रस्त्यावर उतरलेली जनता पुन्हा हिंदू राष्ट्राची निर्मिती करण्यात यशस्वी ठरते का हे पाहावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -