अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या विमानतळाचे काम आता पूर्ण झाले असून अमरावती विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करण्यासाठीची तारीख आता निश्चित झाली आहे.अमरावती विमानतळावरून मुंबईसाठीचे पहिले विमान १६ एप्रिलला टेकऑफ करणार असून यासाठीचे सर्व तिकीट बुकिंग फुल्ल झाली आहे. यामुळे अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.
बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याचा अखेर मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यानुसार १६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. यामुळे अमरावतीकरांची टेकऑफची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. याठिकाणी अलायन्स एअर लाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे. तारीख निश्चित झाल्यानंतर काही वेळातच अमरावती- मुंबईची तिकिट बुकिंग फुल्ल झाली आहे. मुंबईसाठी टेकऑफ होण्यापूर्वी १६ तारखेलाच अमरावती विमानतळाचा शानदार पद्धतीने लोकार्पण सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे हे लोकार्पण करणार असून अमरावती- मुंबई पहिल्या विमानाने प्रवास करणार आहेत.
पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा अद्याप सुरू झालेली नव्हती. अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व अकोला, यवतमाळ जिल्हावासियांची होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली होती. यानंतर विमानतळाचे काम आता पूर्ण झाले आहे. आणि १६ एप्रिल रोजी पाहिले विमान उड्डाण होणार आहे.