सेवाव्रती : शिबानी जोशी
आपण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मेक इन इंडिया, स्किलिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया हे शब्द ऐकत आहोत; परंतु जवळजवळ ४८ वर्षांपूर्वी अशोक दुर्वे यांनी नोकरी सोडून स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचे ठरवले आणि हातात केवळ पाच लाख रुपये असताना स्वतःकडे अनुभव आणि शिक्षण असलेल्या स्किल्सच्या आधारे उद्योग उभारायचं ठरवलं. त्या काळात हे खरोखरंच शिवधनुष्य पेरण्यासारखं होतं; परंतु स्वतःमधील स्किल्स, आत्मविश्वास यावर ठाम विश्वास असल्यामुळे अशोक दुर्वे यांनी हे धाडसी पाऊल उचललं.
पन्नास-साठ वर्षांपूर्वी आपल्या देशातील शिक्षणाची द्वारं आपल्याला माहितीच आहेत. त्या काळात इंजिनीयरिंग शिक्षण घेतलेले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके असत. अशोक दुर्वे यांनी इंजिनीअरिंगमधला डिप्लोमा केला होता आणि शिकत असताना त्यांना एका विदेशी कंपनीमध्ये नोकरी लागली. त्या कंपनीमध्ये उत्पादनाचा प्रशिक्षण आणि अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर अशाच आणखी दोन-तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या त्यांनी केल्या.
गॅजेट म्हणजेच किंवा एखादा थ्रेड स्वरूप वस्तू कोणत्याही इंजिन किंवा वाहनांमध्ये अतिशय फिट्ट बसवण्याची गरज असते. त्यासाठी अचूक अशा गॅजेट्सच उत्पादन आपल्या भारतात होतच नव्हतं. काही युरोपमधल्या देशांमध्ये याचे उत्पादन होत असे आणि हे बनवण्यासाठीची यंत्र आजही भारतात उपलब्ध नाहीत. ती युरोपमधून आयातच करावी लागतात. अल्फा लावेल सारख्या कंपन्यांमध्ये बारा एक वर्षांचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर अशोक दुर्वे यांच्या लक्षात आलं की, आपणही अशा प्रकारचं काम स्वतः हाती घेतलं तर आपण देशांतर्गत मागणी पुरवू शकतो तसेच निर्यातही करू शकतो. अशोक दुर्वे यांनी जेव्हा कारखाना उभारायचं ठरवलं तेव्हा पुण्यात तर खूपच महाग जागा होत्या. अहमदनगरमधील एमआयडीसीमध्ये त्यांना एक जागा कळली. त्यानी कर्जासाठी ॲप्लीकेशन केले आणि त्यांचं एकूणच प्रपोजल आणि उत्पादनाचं वेगळं स्वरूप पाहून त्यांना कर्ज उपलब्ध झालं. स्वतःचे पाच लाख आणि ४५ लाख रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी त्याचे उत्पादन सुरू केले. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ आठ ते दहा कामगार होते. त्यांना अचूकतेच शिक्षण देणंही गरजेचं होतं. अशोक दुर्वे यांचं कुटुंब पुण्यात राहात होतं आणि सुरुवातीची जवळजवळ चार वर्षे ते मात्र अहमदनगर येथे वास्तव्याला जाऊन राहिले. चांगल्या प्रतिष्ठित कंपन्यातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःचा उद्योग स्थापन करण्याच धारिष्ट अशोक दुर्वे यांनी दाखवलं अर्थात त्यामध्ये आणखी एक कारण होतं ते म्हणजे घरच्यांची बहुमोल साथ. त्यांच्या सुविद्य पत्नीने त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांना संपूर्ण साथ दिली. घराची, मुलांची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू कामाचा दर्जा, गुणवत्ता पाहून त्यांना मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. भारतातील प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपन्या, महिंद्रा, हिरो होंडा, टाटा, विप्रो, अशोक लेलँड, गोदरेज, एस्कॉर्टस, भारत डायनामिक्स, इस्रो यांसारख्या संस्थाना ते उत्पादन पुरवतात. आज जवळजवळ त्यांचा ६० टक्के मालाची निर्यात होते. युरोप, सिंगापूर,आफ्रिका खंडात एकूण १७ देशांमध्ये त्यांची उत्पादनं पोहोचत आहेत. अशा तऱ्हेने एका प्रकारे ते देशाच्या निर्यातीमध्ये सुद्धा हातभार लावत आहेत आणि राष्ट्रीय विकासातही सहभागी होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण या क्षेत्रात उत्पादन करणारी कदाचित त्यांची एकमेव भारतीय कंपनी असावी.
अशोक दुर्वे यांनी बाथ, यूके येथील हॉर्मन गियर कंपनी येथे गेज उत्पादन आणि डिझाइनिंग प्रशिक्षण घेतले आणि गेज उत्पादनाचा अनुभव घेतला. आज त्यांची कंपनी SO ९००१ प्रमाणित कंपनी आहे आणि API ५-B आणि API ७-२ मानकांनुसार गेजेसच्यासाठी अमेरिकन पेट्रोल इन्स्टिट्यूटची मान्यता त्यांना आहे. साईज कंट्रोल अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नेमकं काय बनवते. ‘API’ मोनोग्राम वापरण्याची परवानगी त्यांना आहे. अशोक दुर्वे यांचे दोन्ही सुपुत्र अतुल आणि अमित तसंच आता त्यांचा नातू आकाशही या व्यवसायात उतरला आहे. त्यांनी ही इंजिनीयरिंग शिक्षण पूर्ण केलं आहे. हे खूप अनकॉमन असे उत्पादन ते बनवतात. अशाच प्रकारच्या अनकॉमन उद्योगात युवकानी पुढे यावं तर त्यांना भरपूर यश मिळेल अर्थात आपण उत्पादित करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला हवी असं अशोक दुर्वे तरुणांना आवर्जून सांगतात.
दुर्वे यांनी सुरुवात केली तेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग त्यानंतर आलेलं इलेक्ट्रॉनिक्स आणि आता तर एआयचा वापरही ते उत्पादन घेण्यासाठी करत असतात. काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलत आहे, त्याचा वापर आपण आपल्या उद्योगात करून अद्ययावत राहिलं पाहिजे असं दुर्वे सांगतात. त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या कल्पनांना घेऊन अजूनही नवनवीन उत्पादन घेण्याची आकांक्षा ते बाळगून आहेत. हेच खरं तर यशस्वी उद्योजकाचं गमक असतं असं म्हणायला हरकत नाही.