Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसांगा ना जरा...

सांगा ना जरा…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

काहीतरी वेगळं करायचं आहे… पण हे “काहीतरी’’ काय हे काही सापडत नाही आहे… म्हणून म्हटलं सांगा ना जरा काहीतरी!!
लक्षात नसताना, आवडत नसताना, काहीच सुचत नसताना आणि करायचं म्हणून करायचं काहीतरी… म्हणजेच काहीतरी!! असं वाटतं…
नेहमीच हे
“काहीतरी’’
कोड्यात पाडतं…
“खायला दे ना मला…’’
“काय देऊ?’’ “काहीतरी दे’’…
हे प्रत्येकाच्या घरातील संवाद… लहानांपासून वृद्धांपर्यंत घडत असतात.
काहीतरी दिलं की, हे नको, ते नको… दुसरं काहीतरी!

आता हे काहीतरी देणं फार कठीण असतं…
हा काहीतरीचा हट्ट पुरवणं
फार कठीण असतं!
कोणी जरा विचारात, चिंतेत दिसलं की विचारपूस होते, “काय झालं, काहीतरी सांग ना, काहीतरी बोलना, काहीतरी झालंय नक्कीच’’…
ही प्रेमळ विचारपूस काहीतरी झालंय हे जाणून घेण्यासाठी, काळजीपोटी
असते, ते काहीतरी ऐकण्यास मन उत्सुक असतं…
“काहीतरी सांगायचंय…
पण आता नाही… सांगेन कधीतरी’’…
असं कोणी अर्धवट बोलून सोडून दिलं, तर मनाची चलबिचल वाढते, जाणून घेण्याची उत्सुकता ताणली जाते… काय सांगायचं असेल हे काहीतरी!!

घाईत प्रवासाची तयारी करताना बॅगमध्ये काहीतरी कोंबलं आणि निघालं… पण नेमकं काहीतरी महत्त्वाचे राहूनच जाते. गृहिणी स्वयंपाक करण्यापूर्वी घरच्यांना मोठ्या कौतुकाने विचारते, “काय करू आज जेवणात?’’
“काहीतरी कर…’’
पण ते काहीतरी केलं, तर लगेच प्रतिक्रिया येते, “ हे काहीतरीच करून ठेवलं’’!“ उशीर होतोय, किती विचार करणार, काहीतरी घाल आणि चल लवकर… “ मग ते कपडे असो, चप्पल असो नाहीतर आणखी काही!… हे नेहमीचे संवाद होणारच…
दुकानात शिरल्यावर “काहीतरी गिफ्ट द्यायला दाखवा हो’’… असं दुकानदाराला म्हटले जाते… तो ढीगभर “काहीतरी’’ दाखवतो… त्यातलं काहीतरी आवडतं, घेतो व बाहेर पडतो दुकानाच्या आणि हुश करतो’’ मिळालं काहीतरी एकदाचं’’…
एक भाषण एवढं कंटाळवाणं… विषय सोडून काहीतरी पाल्हाळ लावलं होतं… असं होतं ना खूपदा!
हे काहीतरीचं पालूपद
उठता बसता चालू असतं…
“काहीतरी” हातावर ठेवावं
घरी आलेल्याच्या…
बाहेर जाताना “काहीतरी’’
तोंडात टाकावं, तसं जाऊ नये…
काहीतरी “किरकिर’’ चालू असते एखाद्याची… कसलं “ काहीतरी’’ हातात टिकवतात धडा न वडाचं…
आवडलं नाही की असं निघतंच ना तोंडातून! हो की नाही…
लाजून ती म्हणतेच कधीतरी…
“तुमचं आपलं “काहीतरीच” …!!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -