Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीन्यू इंडिया बँक घोटाळा : १२२ कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या...

न्यू इंडिया बँक घोटाळा : १२२ कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’, ईओडब्ल्यूची माहिती

मुंबई : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्या ब्रेन मॅपिंग (BEOS प्रोफायलिंग) चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तो त्याच्या सहभागाची पुष्टी करणारा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही ब्रेन इलेक्ट्रिकल ऑस्सिलेशन सिग्नेचर (BEOS) नावाची फॉरेन्सिक मानसशास्त्रीय चाचणी कालिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पार पडली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “जरी ही चाचणी न्यायालयात थेट पुरावा म्हणून वापरता येत नाही, तरी ती आमच्या तपासाच्या निष्कर्षांना पाठिंबा देते आणि मेहता याच्या भूमिकेची पुष्टी करते.”

Raj Thackeray Letter : ‘महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास थांबा’

या घोटाळ्यात मेहतासह माजी अध्यक्ष हिरेन भानू (सध्या फरार), CEO अभिमन्यू भोन, आणि मेहताचे सहकारी धर्मेश पौन व अरुणाचलम उल्लहनाथन मारुथुवर यांचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

११ मार्च रोजी मेहतावर लाई डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी करण्यात आली होती. मात्र, तो सतत आपले जबाब बदलत होता आणि तपासात सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर BEOS चाचणी करण्यात आली.

EOW च्या तपासानुसार, २०१९ ते २०२५ दरम्यान मेहताने बँकेच्या तिजोरीतून पैसे चोरून धर्मेश पौन आणि उल्लहनाथन यांच्याकडे सुपूर्द केले, जे पैसे परस्पर वापरण्यात आले. १२ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांवर तपासणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला, आणि त्यानंतर मेहताने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी CEO अभिमन्यू भोन, उल्लहनाथनचा मुलगा मनोहर आणि कपिल देढिया यांचा समावेश आहे.

दरम्यान, माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांची पत्नी उपाध्यक्ष गौरी भानू हे परदेशात असून फरार आहेत. भानूंनी एका पत्राद्वारे दावा केला आहे की, RBI तपासणी करत असताना मेहता अचानक गायब झाला आणि नंतर त्यानेच स्वतः फसवणुकीची कबुली दिली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

मुंबई पोलीस १६८ कोटींची २१ स्थावर मालमत्ता जप्त करणार

१२२ कोटींच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मोठी कारवाई करण्याची तयारी केली आहे. या प्रकरणातील पाच प्रमुख आरोपींच्या सुमारे १६८ कोटींच्या २१ स्थावर मालमत्ता लवकरच जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

ही कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १०७ अंतर्गत केली जात असून, मुंबईत या नवीन कायद्यांतर्गत करण्यात येणारी ही पहिलीच मालमत्ता जप्तीची कारवाई ठरणार आहे. BNSS कलम १०७ नुसार गुन्हेगारी माध्यमातून मिळवलेली मालमत्ता जप्त व जप्तीनंतर जप्त ठेवण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

EOW च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “राज्य सरकारच्या बाजूने केलेल्या सादरीकरणानंतर न्यायालयाने या मालमत्तांची जप्ती मंजूर केली असून, त्यामध्ये २१ स्थावर मालमत्ता आहेत, ज्यांची एकूण किंमत सुमारे १६७.८५ कोटी आहे.”

कोणाच्या मालमत्तांचा समावेश?

  • हितेश मेहता (माजी महाव्यवस्थापक) :

  • ७ फ्लॅट्स, १ दुकान आणि १ बंगल्याचा समावेश — एकूण १२ कोटी

  • अरुणाचलम उल्लहनाथन मारुथुवर :

  • १.५ कोटींचे दुकान

  • कपिल देढिया :

  • ७५ लाखांचा फ्लॅट

  • पाटणा आणि मधुबनी येथे प्रत्येकी ५० लाखांचे १ फ्लॅट आणि १ दुकान

  • जावेद आझम :

  • डिजिटल दुनिया स्टोअर्समधून ५५ लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

  • १० इलेक्ट्रॉनिक स्टोअर्ससाठी २.५ कोटींचे भाडे

  • एकूण ४०,००० चौ.फुटांचा भूखंड – १५० कोटी किंमतीचा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा भाग

दरम्यान, EOW ने आतापर्यंत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली आहे, ज्यात मुख्य आरोपी हितेश मेहता याचाही समावेश आहे. मेहताने २०१९ ते २०२५ दरम्यान बँकेच्या तिजोरीतून पैसे चोरून धर्मेश पौन आणि अरुणाचलम यांच्याकडे सुपूर्द केले, असा आरोप आहे.

१२ फेब्रुवारी २०२५ रोजी RBI ने प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांवर केलेल्या तपासणीत हा घोटाळा उघड झाला. त्यानंतर मेहताने गुन्ह्याची कबुली देत इतर आरोपींची माहिती दिली.

तर दुसरीकडे, माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि उपाध्यक्ष गौरी भानू हे परदेशात असून फरार आहेत. त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत कोणत्याही गैरकृत्यात सहभाग नाकारला आहे.

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -