व्हीव्हीआयपी व्यक्ती होऊ शकतात लक्ष्य; ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
मुंबई : मुंबई शहर व उपनगरामध्ये दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत परिपत्रकच जारी केले आहे. ही बंदी ४ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. जी ५ मेपर्यंत राहील.
पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करुन दहशतवादी हल्ला तसेच शहरातील व्हीव्हीआयपी व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. शहरातील गर्दीची ठिकाणेदेखील लक्ष्य केली जाऊ शकतात. याच अनुषंगाने पोलिसांनी या सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घातली आहे.
मुंबई पोलिसांचे अधिकार क्षेत्र आणि डीसीपीच्या परवानगीविना ड्रोन, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर वापरला गेल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.