Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीधैर्यबाहूंचा भरोसा...

धैर्यबाहूंचा भरोसा…

अरविन्द दोडे

जया लाभाचिया आशा
करुनि धैर्यबाहूंचा भरवसा
घालीत षट्कर्मांचा धारसा |
कर्मनिष्ठ ॥ ६.४७४॥

ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेनं, धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून, कर्मनिष्ठ लोक षट्कर्मांच्या प्रवाहात उडी टाकतात, त्या एका वस्तूकरता ज्ञानीजन ज्ञानाचं चिलखत घालतात. सकल संकटांचा परिहार करणारा गुरू म्हणजे ओल्या अंगणातला कल्पतरू! त्याला अक्षरांचा पूर्ण अधिकार आणि तोच ईश्वरकृपेचा आधार. आपण अनेक जन्मांचे भारवाही हमाल. त्याच्या अनंत उपकारांनी देह जड होतो. असा तो सर्वज्ञानाचा पिता. त्याच्या सुवचनांची व्याप्ती अमर्याद. आपलं चित्त जणू भुताचं घर. तो अकर्मदोष निवारण करतो. तो सांगतो, ‌‘एकान्तात वास करा. संकल्पाचा नाश होत नाही.’ दंभाच्या डोहातून तो बाहेर काढतो. आपल्या जीविताचं भांडवल काळाच्या हाती असलं तरी गुरू ते भांडवल सत्कारणी लावतो, हाच गुरुभक्तीचा निव्वळ नफा! चतुरांच्या सभेतले पंडित आपण, संतोषतरुंची रोपं कधी लावतच नाहीत. अशा वेळी धैर्यबाहूंचा आधार देणारा गुरू अधिक विश्वासाचा आहे. हे मनोमन मान्य करतो. तो अनुग्रह करून बहात्तर नाड्यांची शुद्धी करतो. तेव्हा अज्ञानाचा नाश होतो. एवढंच नाही, तर आपल्या इष्टसिद्धीच्या कल्पना तो जाणतो. गुरूचा ग्रह आपल्याबद्दल अनुकूल होतो. आपल्या शरीराचा अतिपवित्र भाग म्हणजे मस्तक. त्याच्या मध्यभागी ताळूच्या ठिकाणी ब्रह्मरंध्र असतं. इथूनच आत्मा शरीरात प्रवेश करतो, राहतो आणि अंतसमयी योग्याचा प्राण जातो, तेव्हा ताळू फुगून खसखस असते तिच्या दाण्याएवढं छिद्र पडतं अन्‌‍ आत्मा निघून जातो, ती जागा म्हणजे ब्रह्म्रंध्र! हे तंत्रशास्त्र योगानं जाणता येतं. गुरू सांगतो. शिकवतो.

मनाची देवता चंद्र. मनाचं न-मन होतं गुरुनमनानं. मग साधक चंद्रलोकात प्रवेश करतो. तिथं शांत होतो. तापमुक्त होतो. शीतल होऊन श्वेतकमळाच्या मध्यभागी म्हणजे सूक्ष्म देहानं, मन-बुद्धीद्वारा जर ध्यानाच्या वेळी आत्म्याकडे पाहिलं तर काय दिसतं? आपला आत्मप्रकाश! चांदण्याप्रमाणे शुभ्रधवल. तिथं वास असतो गुरूचा. तिथं पोहोचण्याचा उपाय म्हणजे गुरुमंत्र. ‌‘मी तोच आहे’ किंवा ‌‘तो मीच आहे’ हा अद्वैताचा दैवी आनंद! मी दिव्यत्वाचा वारसदार आहे, हा आत्मभाव दृढ होतो. अ, ऊ, म ही अक्षरं ताळूच्या मध्यभागी त्रिकोणात असतात. हा आकार कुंडलिनीच्या विवक्षित व्यवस्थेत डोक्याचा भाग फुगवटा धरून वर आलेला असतो. या त्रिकोणात असतं हजार पाकळ्यांचं कमळ. अर्थात हजार नाड्या केंद्रित झालेलं केंद्र आहे. आपल्या बहात्तर हजार नाड्यांची शुद्धी झाली की हे कमळ विकास पावतं. पूर्ण फुलतं. तिथं चित्त एकाग्र केलं की संसारताप नष्ट होतो. श्रीगुरूची आपल्यावर दिव्य दृष्टी असते. महादेव म्हणतात, ‌‘हे प्रिये, संपूर्ण चौदा भुवनं उत्पन्न करणारी, इच्छित पदार्थांची नि:शेष पुष्टी करणारी, सर्व शास्त्रांचं ज्ञान करून देणारी, लौकिक ऐश्वर्याचं क्षणभंगुरत्व दाखवणारी, अवगुणांचं परिमार्जन करणारी गुरूची दृष्टी दिव्य असते. ‌‘तत्‌‍‘ पदार्थावर शिष्याचं लक्ष एकाग्र करणारी जगत्‌‍रूप दृश्याची परमदृष्टी म्हणजे गुरूची दृष्टी. मुक्तिमार्गावर साधकाची निष्ठा टिकवून ठेवते.’

हे सर्व अमृतानुभव यावेत म्हणून साधना करावी. हे गूढ गहन अध्यात्मज्ञान आहे. एक कथा आठवते – एका झोपडीत एक गुरुदेव आणि एक शिष्य राहात होते. दोघांचा व्यवसाय होता मातीची खेळणी करून विकण्याचा. गुरूंनी त्याला शिकवलं होतं की, खेळणी कशी तयार करावीत. दोघंही आठवड्याच्या बाजारात जात, खेळणी विकत. खाऊन पिऊन सुखानं राहात. काम करताना गुरुनाम जपत. फावल्या वेळात गुरुगान गात. गुरूनं केलेल्या खेळण्यांपेक्षा शिष्याची खेळणी अधिक आकर्षक असत. म्हणून ती विकली जात असत. त्यामानानं गुरूची खेळणी कमी विकली जात, तरीही गुरू त्याला म्हणत,
“अधिक उत्तम व्हायला हवीत खेळणी!” हे नेहमी ऐकून ऐकून तो भडकला. म्हणाला, “तुमच्यापेक्षा मी उत्तम काम करतो. माझी खेळणी जास्त विकली जातात! तुमच्या कामात आधी सुधारणा करा. मग मला सांगा.” तेव्हा गुरूंनी खुलासा केला,
“मलाही असाच राग आला होता एकदा, जेव्हा माझ्या गुरूंच्या सततच्या अशा बोलण्यामुळे! ते म्हणत, ‌‘सुधारणा कर.’ मग मी भांडलो. त्यांनी सांगणं बंद केलं. माझ्या कामात पुढे सुधारणा होणं बंद झालं. मी अर्धवट कलाकार झालो. तसं तुझं होऊ नये, एवढीच इच्छा आहे. मला गर्व झाला होता, तसा तुला होऊ नये, हाच हेतू आहे. यापुढे तुला बोलणार नाही काही!”
शिष्याने गुरूचे पाय धरले. म्हणाला,

“गुरुदेव क्षमा करा. मला पूर्ण
कलाकार करा!”
यानंतर तो मोठा कलाकार झाला आणि पुढे मोठमोठे पुतळे, मूर्ती घडवू लागला. मंदिरांचं दगडी बांधकाम करून
कीर्तिवंत झाला. गुरुआज्ञा पाळल्यानं शिष्य निष्णात होतो. त्याचा राग आला तरी त्यामागे आत्मकल्याणाचा उदात्त हेतू असतो. गुरूचा स्वार्थ काय? काहीच नाही. आज्ञा नाही पाळली तर शिष्य अर्धवटच राहतो. पुढे शिव सांगतात पार्वतीला,

‌‘सकलसमयसृष्टि:
सच्चिदानंद दृष्टी ॥’
सूर्यस्नानाप्रमाणे गुरूच्या दिव्य दृष्टीत आत्मसूर्यस्नान घडतं. जे साध्य करण्यासाठी अनेक जन्म तपस्या करावी लागते, ते गुरू आपल्या कृपादृष्टीनं सहज करू शकतो. संकटकाळात गुरूकडे धाव घेण्यापेक्षा गुरुदृष्टीची तेजस्वी किरणं सकल संकटांवर मात करते. म्हणून अनन्य भक्त नित्यनेमानं गुरुभक्ती करतात. नामस्मरण करतात. निष्कंटक होतात. अनिष्ट निवारण होतं. बाधामुक्त होऊन तो निर्भय होतो. युद्धस्वी देवतांच्या हातात शस्त्र असतं. त्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक शत्रूंचा नाश करतात. गुरू नि:शस्त्र असतो. तो तपोबलानं राक्षसांचा वध करतो. नीतिधर्माची घडी बसवतो. केवळ दृष्टीतच इतका पराक्रम असतो की, देवदेवीही त्याचा आदर करतात. गुरू हा दृष्टिसमोरची अशाश्वत सृष्टीतील फोलपणा पटवून देतो. सत्यसृष्टीचं दर्शन घडवतो. तो समजावतो, “जीवनाला कंटाळू नका. जगाला टाळू नका. सर्वांचा प्रेमानं स्वीकार करा. अतिबुद्धिमान दूर जातील, ते अन्‌‍ त्यांचं नशीब! सुखानं संसार करा. प्रेमानं वातावरण भरून टाका. मुक्तीचा मार्ग सोडू नका…” वगैरे. ही आज्ञा जो पाळतो त्याची प्रज्ञा तेजाळते. प्रकाशमान होते. यापेक्षा लाभ कोणताच नको. त्याचं सतचित्‌‍ आनंदमय स्वरूप पाहणं, अनुभवणं, एकरूप होणं हा मथितार्थ! जय गुरुदेव!
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -