बीड : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्या दरम्यान एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमा दरम्यान तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेबाबत मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, लाडक्या बहिणीला आपण १५०० रुपये देतोय, परंतू राज्याची आर्थिक परिस्थिती काळानुरूप सुधारेल तेव्हा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना २१०० रूपये देण्याचा विचार करू, असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आश्वस्त केल्याचे पाहायला मिळाले.
पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना २१०० नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणाऱ्या या योजनेतील लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचे २१०० रूपये मिळण्यासाठी अजून वाट पाहवी लागणार असल्याचे चित्र दिसतेय.