मुंबई : सध्या महाराष्ट्रात कुणाल कामरा विषय जोर धरू लागला आहे. कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह कविता रचल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कामराच्या कवितेनंतर शिवसैनिकांनी संतापून त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली त्यानंतर त्याने केलेल्या कवितेचे पडसाद अधिवेशनावर सुद्धा पडले होते. त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून कुणाल कामरा फरार होता. त्यानंतर त्याला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले. पोलिसांनी तिसऱ्या समन्सद्वारे कुणाल कामराला ५ एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. पण कुणाल कामरा चौकशीला अनुपस्थित राहिला होता. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादानंतरही तो सोशल मीडियावर विविध वादग्रस्त पोस्ट आणि स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत आहे. आता कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे.
काय आहे कुणाल कामराची पोस्ट ??
‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन १- आक्रोश- त्यांच्या कामासाठी ब्रँड्सने जाहिराती मिळवून देणं बंद करण्यासाठी पुरेसं आहे. २- अधिक आक्रोश करा- खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम संपेपर्यंत ३- आणखी मोठा आक्रोश करा- जेणेकरून मोठमोठी ठिकाणं जोखीम घेणार नाहीत. ४- हिंसक आक्रोश करत रहा- जोपर्यंत सर्वांत लहान ठिकाणंदेखील कार्यक्रमांसाठी त्यांचे दरवाचे बंद करत नाहीत. ५- त्यांच्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवा- कलेचं ठिकाण गुन्हेगारीच्या ठिकाणात बदला.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
आता कलाकाराकडे फक्त दोनच पर्याय उरतात: एकतर त्यांचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बनणं किंवा मौन बाळगून कोमेजणं हे फक्त प्लेबुक नाही, हे एक राजकीय शस्त्र आहे, गप्प बसवण्याचं एक यंत्र आहे,’ असं त्याने लिहिलंय. दरम्यान आता कुणाल कामराच्या या पोस्टनंतर मुंबई पोलीस कोणतं नवीन पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.