मुंबई : रविवार म्हटलं कि सुट्टीच्या दिवशी फिरणं होत. पण मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडतात. गाड्या उशिराने असतील तर प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र आता शनिवारीसुद्धा घेण्यात येणाऱ्या पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि २९ ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी (दि २९) रात्री उशिरा १:३० वाजल्यापासून रविवारी (३० मार्च) पहाटे ४ : ३० वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. दरम्यानच्या काळात अंबरनाथ ते बदलापूरमधील रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. ब्लॉक काळात अंबरनाथ ते कर्जतदरम्यान कोणतीही लोकलसेवा सुरू राहणार नाही, तर काही रेल्वेसेवा कमी- जास्त प्रमाणात रद्द केल्या जातील. लोकल सेवांमध्ये शनिवारी रात्री ११ :१३ मिनिटांनी निघणारी परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत जाणार असून ११:५१ वाजता निघणारी सीएसएमटी- बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. दरम्यान या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे