Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसजग पालकत्वाची 4 C सूत्रे

सजग पालकत्वाची 4 C सूत्रे

डाॅ. स्वाती गानू

बऱ्याचदा पालक असं विचारतात की, जेव्हा एखाद्या परिस्थितीत किंवा प्रसंगात खूप संताप येत असेल तर त्या क्षणी Heat of the moment ला कसं वागावं? जेव्हा पालक आणि मुलं यांच्यात अतिशय तणावपूर्ण असं काही घडतं आणि पालक तणावात असतात, प्रचंड निराश होतात तेव्हा काय करावे? अशा परिस्थितीत हे 4 C चे सूत्र जाणीवपूर्वक/ बेसावध मनाशी बाळगलंत तर ते आपल्या दोन्ही मनांकरिता मार्गदर्शक ठरतं. शांत राहणं, स्पष्ट विचार ठेवणं, मुलांशी जोडलेलं राहणं, पालक आणि मुलं दोघांनी एकमेकांना जोडून घेऊन काम करणं. या चार सूत्रांमुळे आपण शांततेच्या मार्गाने मुलांबरोबर काम करू शकतो. जेव्हा आपण रिस्पॉन्ड करण्याऐवजी रिॲक्ट करतो तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. ही परिस्थिती बदलायची असेल तर काय करायला हवं?

मुलांशी वागताना हलगर्जीपणा न करता, आपल्या कर्तव्याला न चुकता या 4 C सूत्रांचा वापर करा. जेव्हा आपल्याला सजग राहून कुटुंबात, विशेषतः मुलांमध्ये आणि आपल्यात मनाची शांतता टिकून ठेवायची असते. परिस्थिती हातातून निसटू द्यायची नसते, चिघळू नये असं वाटते तेव्हा हे चार शब्द आपले पालकत्व प्रभावी करायला मदत करतात. या चार पायऱ्यांचा जरूर वापर करा. पालकांनो याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

१) शांत : (तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे)
मुलांना ‘शांत हो’ म्हणण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करू या. जिला आपण कंट्रोल करू शकतो ती एकमेव व्यक्ती म्हणजे आपण स्वतः असतो आणि स्वतःला कसं सांभाळायचं हे कौशल्य शिकणं खरंच आवश्यक असतं. स्वतःला शिस्त लावणं ही मुलांना स्वयंशिस्त लावण्याची एक गुरुकिल्लीच असते. ही सवय जर लावलीत तर काम सोपं होतं याकरिताच या सवयीबाबत फोकस्ड राहा, त्याचा सराव करा. जेव्हा परिस्थिती गंभीर होते आणि त्रासदायक होते. विशेषतः आपण मुलांना एखाद्या गोष्टीसाठी ‘नाही’ म्हणतो. ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करतो. करायचं नाही, ‘थांब’ म्हणतो, तेव्हा’ स्टॉप’ म्हणणं निदान त्या क्षणी सोडायचंय आणि दीर्घ श्वास घेणं, शांत राहणं जमवा. अगदी आणीबाणीच्या गंभीर परिस्थितीत जोपर्यंत उपाय मिळत नाही तोपर्यंत तरी थोडा ‘पॉज’ घ्या. स्वतःशी कनेक्ट व्हा म्हणजे तुमचं मन शिफ्ट होऊन शांत व्हायला सुरुवात होईल. तुमची ऊर्जा, तुमचं वागणं यावर सकारात्मक परिणाम होईल. मुलांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मुलांच्या भोवताली जी माणसं असतात, ती जशी वागतात, जे मॅनरिझम्स ते पाहतात, या गोष्टींचा त्यांच्यावर विशेषत्वाने प्रभाव पडतो. मुलांमध्ये आपल्याला जो बदल अपेक्षित आहे तो बदल खरंतर आपणच करायला हवा. आपण मुलांशी बोलताना शांतपणे घेतलं, ओरडून न बोलता गोड भाषेत बोललो तर परिस्थिती निवळत जाते. प्रत्येकच मूल ताबडतोब अशा पद्धतीने पालकाला असा प्रतिसाद देईल असे नाही पण परिस्थिती शांत होईल हे नक्की. स्वतःला कसे शांत कराल?

१. चेहरा थंड पाण्याने धुवा.
२. तिथून बाहेर जा. थोडं घराबाहेर पडा किंवा दुसऱ्या खोलीत जा.
३. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.
४. आता या क्षणी काय महत्त्वाचं आहे?

२. स्पष्ट विचार ठेवा :
या क्षणी सगळ्यात काय महत्त्वाचं आहे ते मनात स्पष्ट ठरवा. जेव्हा तुम्ही स्पष्ट आणि पारदर्शी विचार कराल की या परिस्थितीत मुलांशी वागताना काय महत्त्वाचं आहे ओरडणं, रागावणं, त्रागा, चिडचिड, संताप, हताशा की परिस्थिती नियंत्रणात आणणं, शांत होणं, शांत करणं तेव्हा यातून काही भरीव, सृजनात्मक निर्माण होईल. हे केव्हा जमेल जेव्हा ९० सेकंद तुम्ही तुमच्या भावना ओळखायला दिले तर शरीरात केमिकल प्रोसेस होते आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. आपल्या सैरावैरा विचारांना सेटल करा आणि काय करणं महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष
एकाग्र करा.

३) मुलांशी कनेक्ट राहा :
एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेतल्या तर एकमेकांशी तुम्ही कनेक्ट राहाल? कनेक्शन म्हणजे काय तर मुलांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहायला शिका.
आपलं मूल काय विचार करतं, काय अनुभव घेतं यासाठी मुलांच्या काय गरजा आहेत ते माहीत करून घ्यायला हवं. आपल्या गरजा आई-बाबांना कळताहेत हे मुलांना समजलं की त्यांचं नकारात्मक वागणं कमी होईल. आपल्याकडे लक्ष दिलं जात आहे. आपलं म्हणणं ऐकलं जात आहे, समजून घेतलं जात आहे हे कळलं की मुलांमध्ये प्रेम आणि मायेची भावना व्यक्त करण्याला सुरुवात होते.

४) उपाय शोधणे :
मुलांशी कनेक्ट झालात तर मुलं तुम्हाला उपाय शोधायला सहकार्य करतात. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भावना समजून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हजर असता, उपलब्ध असता तेव्हा तुम्ही मुलांना सहकार्य करायला मदतच करता. तुम्हाला हे कळतं की मुलांच्या कोणत्या गोष्टींबाबत तडजोड करायची आणि कोणत्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायचं? त्यावर चर्चा करायची? अगदी मुलांनाच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सहभागी करून घ्यायचं हेही जमू शकतं. पालकांनो अशा प्रकारे calm (शांत राहणे), clear (काय महत्त्वाचं आहे याबाबत विचारात स्पष्टता आणणे), connect (मुलांच्या भावना व गरजांना समजून घेणे) आणि collaboration (उपाय शोधणे) या C सूत्रांची प्रॅक्टिस केलीत तर पाचवं सूत्र तुम्हाला सापडेल ते असेल confidence अर्थात आत्मविश्वास. स्वतःच्या चुकांकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहा आणि स्वतःचा पालक म्हणून रोजचे रोज विकास होऊ दे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -