-
गोलमाल: महेश पांचाळ
बोरिवली पश्चिमेकडील भगवती हॉस्पिटलच्या बाजूला बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम आहे. ५ मार्च २०२३ रोजी दुपारी १४.५० ते १५.३० या १० मिनिटांच्या वेळेत दोन अनोळखी व्यक्ती एटीएममध्ये आत शिरले व त्यांनी स्क्रू ड्रायव्हरसारख्या हत्याराने मशीनमध्ये काही तरी छेडछाड केली आणि एटीएम रूमच्या बाहेर जाऊन थांबले. काही वेळाने बँकेचा एक ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आला व त्याने दोन ते तीन वेळा एटीएम कॉर्ड स्वीप करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मशीनमध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाला असावा असे वाटल्याने तो तेथून निघून गेला. त्यानंतर बाहेर थांबलेले हे दोघे जण पुन्हा आतमध्ये शिरले. त्यांनी एटीएम मशीनच्या कॅश विड्रॉलच्या ठिकाणी हात घालून त्यातील बेल्ट हाताने खेचून काढला आणि मशीनच्या आत मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात पैसे आले की नाही याची खात्री केली व एटीएम मशीनचे नुकसान करत एटीएम मशीनमध्ये अडकलेले पैसे खेचून काढले आणि दोघे तेथून पळून गेले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपलेले हे नाट्य होते. त्या आधारावर बीसीसी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जॉय जोसेफ फरगोज यांनी बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या बँकेची मुख्य शाखा ही पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात असली तर बोरिवली, दहिसर, कांदिवली भागात ख्रिस्ती समाजाची वस्ती असल्याने मुंबईमध्ये या बँकेने एटीएम सुविधा देण्यासाठी एटीएम शाखा निर्माण केल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि पथकांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागून त्याचा सखोल तपास केला. तसेच ज्यांनी त्या दिवशी पैसे विड्रोल केले. त्याच्या मोबाइल नंबरचा तपास केला. घटना घडली त्यावेळी संशयित आरोपींनी स्वत:जवळील एटीएम कॉर्ड मशीनमध्ये टाकले होते. त्यामध्ये दुपारी तीन ते सव्वातीनच्या सुमारास शेवटचा मोबाइल नंबर ज्याचा तांत्रिक तपासात दिसला. त्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न झाला. धीरेंद्रकुमार रामदेव पाल या २२ वर्षांच्या तरुणाचा हा मोबाइल नंबर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मोबाइल कंपनीकडून त्याची सविस्तर माहिती पोलिसांनी मिळवली तेव्हा तो उत्तर प्रदेश राज्यातील कुंडा गाव, प्रतापगड येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी अनोळखी नंबरवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याला फोन करून तो कुठे आहे याची अंदाज पोलिसांना घ्यायचा होता. दुसऱ्यादा त्याचा संपर्क झाला तेव्हा तो आपल्या गावी असल्याचे पोलिसांना समजले. महामुंबई परिसरात अशा पद्धतीने एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यातील एकाही गुन्ह्याचा तपासात आरोपींना अद्याप गजाआड करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवर त्याची नोंद नव्हती. अनोळखी चोरांना शोधण्याचे एमएचबी पोलिसांपुढे कौशल्य होते. धीरेंद्रकुमारचा मोबाइल हा निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता. त्यावरून धीरेंद्रकुमारचे मोबाइलचे लोकेशन जय भीम नगर, कळवा, जिल्हा ठाणे येथे असल्याचे कळले. त्यावरून पोलिसांनी एक टीम तयार केली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार शिंदे, पोलीस हवालदार खोत, पोलीस नाईक देवकर, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई सवळी तसेच पोलीस शिपाई हरमाळे यांनी प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन छापा टाकला असता धीरेंद्रकुमार हा एका पत्र्याच्या झोपडीत राहत असल्याचे आढळून आले. तो घराबाहेर पडत नसल्याचे कळताच झोपडीस चारही बाजूने पोलीस पथकाने घेरले. त्यावेळी पत्रा तोडून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी वरती चढून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत पळत असलेला अभिषेक यादव या साथीदाराला अटक करण्यात आली. पोलिसांना या दोघा आरोपींना पकडण्यासाठी तब्बल एक महिना शोध घेतला होता.
धीरेंद्रकुमार आणि अभिषेक हे दोघेही कुंडा गाव, प्रतापगड या एकाच गावातील रहिवासी आहेत. मुंबई परिसरातील एटीएम सेंटरवर पाळत ठेवून ज्या ठिकाणी गर्दी नाही तसेच सुरक्षा रक्षक कार्यरत नाही अशा एटीएम सेंटरमध्ये पैसे चोरायचे, अशी मोंडस ऑपरेडी पोलिसांना कळाली. या पद्धतीने या दोघांनी आतापर्यंत २१ एटीएम सेंटरमध्ये गंडा घातला होता. सुट्टीच्या दिवशी डोंबिवली, नवी मुंबई, मीरा रोड, नालासोपारा या ठिकाणच्या एटीएम सेंटरमध्ये चोरी करायची. पैसे हातात आले की जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश या ठिकाणी जायचे. त्यामुळे दोघा आरोपींनी आतापर्यंत केवळ चोरीच्या माध्यमातून पैसे उकळण्याची शक्कल शोधून काढली होती. याच पद्धतीने एकाच दिवशी परिसरातील एटीएमवर पाळत ठेवून ८ फेब्रुवारी रोजी नालासोपारा येथे एकूण ६ बँकेचे एटीएम, २३ फेब्रुवारी रोजी चेंबूर येथे एकूण ५ एटीएम, ५ मार्च रोजी एम.एच.बी,दहिसर येथे एकूण ५ बँकेचे एटीएम, ३ मार्च रोजी डोंबिवली येथे एकूण ५ एटीएम सेंटर अशा २१ ठिकाणी मशीनमध्ये घोळ करून पैसे लुबाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तात्पर्य : उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून मुंबई परिसरात येऊन तात्पुरत्या स्वरूपात राहायचे आणि एटीएम सेंटरची लूट करायची हा फंडा घेऊन शोधून गुन्हेगारी करणारी टोळी कार्यरत असेल, तर एटीएमची सुरक्षा कशी राखावी याची जबाबदारी बँकांवर आली आहे.