Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअमेरिकेतील माझा पहिला कार्यक्रम!

अमेरिकेतील माझा पहिला कार्यक्रम!

फिरता फिरता – मेघना साने

हल्ली अनेक मुली शिक्षणासाठी अमेरिकेला जातात. त्यामुळे एखादी तरुण मुलगी एकटीच अमेरिकेला निघाली असे कळले तरी फार आश्चर्य किंवा चिंता वाटत नाही. पण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. १९९१ साली मी एकपात्री कार्यक्रम करण्यासाठी एकटीच अमेरिकेला निघाले तेव्हा ती फार नवलाईची गोष्ट होती. अमेरिकेला रॉचेस्टर येथील गणेशोत्सवात मला एकपात्री कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण होते. त्यावेळी मोबाईल फोन वगैरेही नव्हते. रॉचेस्टर येथील माझी नातलग लता कार्लेकर यांच्याकडे मी मुक्काम करणार होते. मी न्यूयॉर्कपर्यंतचे तिकीट काढले होते. डॉ. भालचंद्र कार्लेकर मला एअरपोर्टवर घ्यायला येणार होते. ते येणार म्हणून मी इतकी निश्चिन्त होते की न्यूयॉर्कहून रॉचेस्टरला कसे जायचे असते याचा विचारही मी केला नव्हता.

माझा अमेरिकेचा न्यूयॉर्कपर्यंतचा हा पहिलाच प्रवास, तोही एकटीने, नीट पार तर पडला. विमानात माझ्या शेजारी एक मराठी मुलगा होता. तो शिकागोला जाणार होता. न्यूयॉर्कपर्यंत आम्ही अधून मधून गप्पा मारत होतो. उतरल्यावर मात्र तो कोठे गायब झाला मला कळले नाही. इमिग्रेशन वगैरे कसे करायचे ते समजून घेऊन मी त्या परीक्षेत पास होऊन सामान घेतले. ते ट्रॉलीवर टाकून गेटवर गेले. माझ्या अपेक्षेप्रमाणे डॉ. कार्लेकर मला दिसायला हवे होते. ते माझे नातलग असल्याने नक्कीच लवकर येऊन उभे असतील याची खात्री होती. मी दोन्ही गेटवर जाऊन बघितले. डॉ. कार्लेकर कुठेच दिसेनात. आता काय करावे? फोन करावा का त्यांच्या घरी? पण एअरपोर्टवरून फोन कसा करायचा असतो ते माहीत नव्हते.

एका अमेरिकन माणसाने मला डॉलरचे कॉईन दिले. बुथवरून दहा वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण नुसती रिंग वाजत होती. आता माझ्याकडे शेवटचा उपाय म्हणजे एअर इंडियाच्या काउंटरवर जाऊन मदत मागणे. माझे सामान ट्रॉलीवरून ढकलत बाहेरच्या मार्गाने मी त्या काउंटरला पोहोचले. तो माणूसही मराठीत बोलू लागला. मला अगदी हायसं वाटलं.

‘द्या, मी तुम्हाला फोन लावून देतो’, त्याने तो लँडलाईन नंबर लावून दिला.
‘हॅलो’, असा गंभीर आवाज आला. तो लता कार्लेकर यांचा होता. त्यामुळे मी हुश्श झाले. मी त्यांना सांगितले की, एअरपोर्टवर घ्यायला कुणीच आले नाही. तेव्हा गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, ‘कार्लेकर
येणार होते. पण त्यांना अचानक हॉस्पिटलमधे अॅडमिट करावे लागले. ते सिरीयस आहेत. आम्ही सर्व हॉस्पिटलमधेच बसून होतो. मी आत्ताच घरी आले, खूपच गोंधळ झाला असावा आणि यात त्यांची धावपळ झाली असावी. मी एअरपोर्टला वाट पाहत उभी असेन याचा विचारही करायला त्यांना वेळ मिळाला नव्हता.

‘बरं, मी आता कसे यायचे आहे?’ मी विचारले. न्यूयॉर्क ते रॉचेस्टर हे साधारण पाचशे किलोमीटर अंतर आहे.
‘तू फ्लाईटने ये. न्यूयॉर्क एअरपोर्टला रॉचेस्टरचे तिकीट मिळेल. न्यूयॉर्कवरून तुला लगार्डिया एअरपोर्टला जावे लागेल. ते न्यूयॉर्क एअरपोर्टवरून वीस मिनिटे दूर आहे. पण टॅक्सीने जा. रॉचेस्टरला तुझी नणंद वृषाली तुला घ्यायला येईल. आता आमच्याकडे उतरता येणार नाही. वृषाली तुला तिच्या घरी सोडेल आणि कामावर जाईल. तिची आजी घरी असेल.’

माझा सर्वच कार्यक्रम बदलला होता. पण मी हिम्मत हारणारी नव्हते. माझ्याकडे पाचशे डॉलर्स होते. मी तिकीट कुठे काढायचे हे शोधून काढले. तिकीट काढले, नोटा सुट्ट्या झाल्या. विमान दीड तासांनी सुटणार होते. काहीही खायला प्यायला मला वेळ नव्हता. सामान ढकलत टॅक्सीचा स्टॅन्ड शोधला. टॅक्सीचे वीस डॉलर होणार होते. टॅक्सीने एकटीनेच अमेरिकेत बाहेर पडायचे म्हणजे थोडी भीती वाटत होती. पण जायला तर हवे होते. त्याच ठिकाणी नेमका मला ओळखीचा चेहेरा दिसला. तो विमानात माझ्या शेजारी बसलेला मराठी तरुण होता. तोही सामानाची ट्रॉली घेऊन उभा होता.
‘लगार्डिया एअरपोर्ट’ मी त्याला विचारले.
तो म्हणाला, ‘येस, चला एकत्र जाऊ’

आम्ही असा प्लॅन केला की लगार्डियाला जायला एकच टॅक्सी करायची. वीस डॉलर्स शेअर करायचे. पण टॅक्सीवाल्याला आपण एकाच फॅमिलीचे वाटलो पाहिजे. तसेच झाले. टॅक्सीवाला उंचापुरा धिप्पाड आणि ब्लॅक होता. त्याने दोन हातात आमच्या दोन बॅगा उचलून अगदी सहज टॅक्सीत टाकल्या.

टॅक्सीत बसल्यावर मी त्या मुलाला हळूच दहा डॉलरची नोट दिली. टॅक्सीत पूर्ण वेळ आम्ही घाबरून काहीच बोलत नव्हतो. अखेर लगार्डियाला उतरलो व सामान घेऊन वेगवेगळ्या दिशेने पळालो. रॉचेस्टरचे विमान सुटणार त्या गेटला मी धावत सुटले. मला खूप तहान लागली होती. कुणाला तरी पाणी कुठे, म्हणून विचारले. त्याने दूरवर कुलरकडे अंगुलीनिर्देश केला. मी धावत जाऊन पाणी पिऊन आले. तोच माझ्या नावाचा पुकारा ऐकू आला. मी गेटवर येताच मला एका सुंदर बाईने विचारले, मेघना साने? मी म्हटले, ‘येस’

ती म्हणाली, ‘Rochester flight is waiting for you’
विमानाची वेळ झालीच होती की! ती बाई मला विमानात घेऊन गेली. विमानात गेल्यावर मला धक्काच बसला! संपूर्ण विमान रिकामे होते! अगदी शेवटच्या सीटवर एक म्हातारे जोडपे बसलेले होते. हे फ्लाईट मला कुठल्या अज्ञात स्थळी तर घेऊन जाणार नाही ना? अशी शंका येऊन मी बावरून बसले होते. पण नाही. ते मला रॉचेस्टरलाच घेऊन गेले. माझी नणंद एअरपोर्टला मला घ्यायला आली होती. पुढे आठच दिवसांनी माझा ‘कोवळी उन्हे’ हा कार्यक्रम रॉचेस्टरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात अगदी थाटात झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -