-
प्रमोद सावंत
येणाऱ्या काळात वेब ३.० च्या नव्या पर्वामुळे भारताच्या माहिती अवकाशात कमालीचे बदल पाहावयास मिळणार आहे. वेब १.०, वेब २.० नंतर आता भारतात वेब ३.० अवतरणार आहे. वेब ३.० विकेंद्रित वेब म्हणून ओळखले जाते. ते इंटरनेटच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. भारतामध्ये १९८९ साली वेब १.० आले जे टेक्स्ट स्वरूपात होते. वर्ल्डवाइड वेब नावाने आपण त्याला ओळखतो. यानंतर १५ वर्षांनी २००४ साली वेब २.० आले, जे सध्या आपण वापरतो. काही माहिती हवी असल्यास आपण गुगलसारख्या सर्च इंजिनचा वापर करतो. जगात कोणाशीही संपर्क साधायचा असेल, तर फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करतो. हे सारे केंद्रित आहे. अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या, नेटबँकिंग यांचादेखील वेब २.० मध्ये समावेश होतो.
केंद्रित म्हणजे काय, तर या गुगल, फेसबुक या साऱ्या खासगी कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या सेवा घेणाऱ्या वापरकर्त्यांचा डेटा या कंपन्यांकडे आहेत. या कंपन्यांनी हा डेटा वापरल्याची बातमी आपण माध्यमांमध्ये वाचली असेल. वेब ३.० मध्ये विकेंद्रीकरण असल्याने वापरकर्त्याचा डेटा हा कोणा एका कंपनीच्या हाती नसेल. आज आपली एखादी पोस्ट वा फोटो फेसबुकसारखे समाजमाध्यम काढून टाकू शकते. मात्र वेब ३.० मध्ये हा डेटा आपल्याकडे असल्यामुळे तो सुरक्षित ठेवता येईल. वेब ३.० द्वारे आपल्याला एखादा कन्टेन्ट इंटरनेटवर शेअर करायचा असेल, तर आपल्याला एक टोकन मिळेल. सोबतच कंटेन्टचा पूर्ण अधिकार आपल्याकडे असेल. वेब ३.० मध्ये गुगल, फेसबुक, ट्विटरसारख्या कंपन्या आपला कंटेन्ट हटवू शकणार नाही. खरं तर आपला डेटा कोणत्या कंपनीमध्ये सेव्ह न होता आपल्या डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार आहे.
वेब ३.०चा बँकिंग प्रणालीमध्ये फार महत्त्वाची भूमिका असेल. वेब ३.० संकल्पना ब्लॉकचेनवर आधारित आहे. त्यामुळे ती विकेंद्रित आहे. उदाहरणार्थ सध्या गवगवा असलेले क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन ब्लॉकचेनवर आधारित आहे. त्यामुळे ते विकेंद्रित चलन आहे. म्हणजे ते कोणत्याही बँकेत नसून सामान्य चलनात आहे. बँक बुडाल्यास बँकेत ठेवलेला पैसा बुडण्याची किंवा फसगत होण्याची शक्यता जास्त असते. ”ब्लॉकचेनवर गुन्ह्यांचा मागोवा काढण्याची क्षमता आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यात वेब ३.० सहाय्यक ठरू शकते. ब्लॉकचेनवर मनी लॉड्रिंगसारख्या आर्थिक गुन्ह्यांना वेब ३.० द्वारे प्रतिबंध करता येऊ शकेल”, असे मत ऑन रॅम्प मनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव डहाके व्यक्त करतात.
पारंपरिक बँकिंग प्रणालींमधून वगळलेल्या लोकांना आर्थिक सेवा प्रदान करण्याची क्षमता विकेंद्रित वित्तमध्ये आहे. विकेंद्रित वित्त क्षेत्रासाठी वेब ३.० हे आशेचा किरण आहे. ”भारतातील विकेंद्रित वित्तच्या वापराच्या काही प्रमुख प्रकरणांमध्ये मायक्रोफायनान्स, रेमिटन्स, पीअर-टू-पीअर कर्ज, विमा आणि डिजिटल ओळख यांचा समावेश होतो. विकेंद्रित वित्तमध्ये कर्जदारांना मध्यस्थांशिवाय कर्ज मिळू शकते, तसेच त्वरित पैसे पाठवण्याचे व्यवहार सुलभ करू शकतात”, असेदेखील गौरव डहाके म्हणतात.
स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हा उद्योगजगतात परवलीचा शब्द झालेला आहे. विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील करार स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे केला जातो. रिअल इस्टेट क्षेत्रात मालमत्ता व्यवहार करणे, पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात माल नीट पोहोचला की नाही याचा मागोवा घेण्यासाठी किंवा कराराचे पालन निश्चित करण्यासाठी, आरोग्य क्षेत्रात रुग्णांच्या डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेब ३.० साहाय्यभूत ठरणार आहे. वेब ३.० हे भारताच्या आर्थिक विकासासाठी एक नवीन पर्व घेऊन येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.