Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखज्ञानियाचा वेलू गेला गगनावरी...

ज्ञानियाचा वेलू गेला गगनावरी…

  • संजय भुस्कुटे : ज्येष्ठ पत्रकार

लाखो श्री सदस्यांचे श्रद्धास्थान आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा केलेला बहुमान हा समस्त श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव आहे. बैठक चळवळीचे प्रणेते कै. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजमनात आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आणि देव, स्वदेश व धर्म यात्री-सूत्रीतून समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून प्रहार करत समाजाला सकारात्मक वाटेवर आणलं. बैठक चळवळीतून असंख्य व्यसनी लोकांना आध्यात्मिक शिकवणीतून चांगुलपणाच्या वाटेवर आणलं. नानासाहेब धर्माधिकारी यांची समाजबदलाची ही धुरा त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लीलया पेलली आणि त्यातून आज बैठक चळवळीचा विश्वात्मक परीघ कवेत घेणारा चळवळीचा वटवृक्ष आज दिमाखात उभा आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर वैचारिक प्रेरणेच्या बळावर समाजमनामध्ये आमूलाग्र क्रांती करणारी श्री सदस्यांची दासबोधी चळवळ ही वर्तमानातील सकारात्मक घडामोड आहे. भारतीय स्वातंत्र्यकरीता क्रांतीकारकांच्या ओजस्वी विचारातून भारतीय स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकल गेलं. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उण्यापुऱ्या ७५ वर्षांत सामाजिक ध्येयवाद हा कमालीचा कमकुवत झाला. विकासाच्या प्रगतीत संवादाची भाषा थिटी पडू लागली. मग साहजिकच आधुनिकता, चंगळवाद याने समाजातील दोन पिढ्यांना घेरून टाकलं. कोणत्याही देशाची सामाजिक शक्ती ही त्या देशातील नागरिकांच्या चांगुलपणावर मोजली जाते. विकासाच्या विचारशून्य यंत्राने नव्हे. विकासाच्या वाटचालीत आर्थिक विषमतेची दरी, त्यातून निर्माण होत असलेल दारिद्र्य, अपेक्षांचं ओझ सांभाळता न येत असल्याने येणारे कुटुंबातील औदासिन्य, यावर क्षणभर सुखाची फुंकर म्हणून नकळतपणे स्वीकारली जात असलेली व्यसनाधीनता, दारिद्र्य निर्मूलनासाठी अंधश्रद्धेचा पगडा, त्यातून येणार वैफल्य याने समाजमन पोखरू लागले होते. ही सारी घलमेल कनिष्ठ, मध्यमवर्गीय दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबात सुरू होती, तर अतिश्रीमंतांच्या घरात पैसा असूनदेखील संवादाची वैचारिक समृद्धी नसल्याने अशी कुटुंब देखील मानसिक विकाराने पछडली होती. यावर बैठक चळवळीच्या माध्यमातून केले गेलेले वैचारिक प्रबोधन यातून सशक्त समाजमनाची निर्मिती केली गेली आणि ती अव्याहातपणे केली जात आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या श्री सदस्यांच्या चळवळीला वर्तमानातील समाजमनातील महत्त्वाच्या प्रश्नाची दिलेली जोड हे आप्पासाहेब धर्माधिकारी याचं वेगळपण आहे. श्री समर्थ रामदासांच्या ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या समर्थ वचनाप्रमाणे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या मितभाषी, शालीन, सुसंस्कृत, मृदू, सत्त्वशील व सत्यवचनी स्वभावातून समाजात दिसून येत असलेलं उणपूरं भान जबाबदारीने पेलत, त्याला सामाजिक चळवळीचा नवीन आयाम दिला.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बदलत्या पर्यावरणाचे स्वरूप लक्षात घेऊन वृक्ष लागवड व तिचे संगोपन, स्वच्छता अभियान ही अभिनव चळवळ सुरू केली. आजपर्यंत गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय कार्यक्रमातून कोट्यवधी वृक्षाची लागवड केली गेली. पण एका पाहणी अहवालानुसार, त्याच्या संगोपनाची टक्केवारी २०%हूनही कमी असल्याचे स्पष्ट झालं आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वृक्ष लागवडीबरोबरच तिच्या संगोपनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं, हे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून लाखो श्री सदस्यांनी कोणतीही जाहिरात, फोटोबाजी न करता लाखो वृक्षांची लागवड केली आहे व त्याचे संगोपन केले जात आहे. वृक्ष लागवडीकरिता अंगीकारण्यात येणारी पद्धतदेखील शास्त्रशुद्ध असल्याने लावण्यात आलेले वृक्ष ९०%पेक्षा अधिक प्रमाणात जिवंत आहेत, हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या चळवळीचे फलित आहे. आज या लाखो वृक्षांची लागवड केलेल्या ठिकाणांची सूची, त्यांच्या संगोपनाचे वेळापत्रक त्यासाठी प्रत्येक श्री सदस्य याचे दररोज असणाऱ्या वेळापत्रकानुसार योगदान याने महाराष्ट्रात वृक्ष लागवडीची एवढी मोठी चळवळ उभी राहिल्याचे यापूर्वीच्या इतिहासात कधीही घडलं नव्हते आणि पुढच्या भविष्यातदेखील घडू शकणार नाही. शासकीय स्तरावरून कोट्यवधी रुपये खर्च करून जे काम जमू शकत नाही, ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या एका हाकेने सहज शक्य होत आहे. याचे कारण आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधी निरूपणाच्या माध्यमातून दिलेली शिकवण श्री सदस्यांच्या नसानसांत, अंत:करणात भिनली आहे. परमार्थ म्हणजे होमहवन, मोठे-मोठे यज्ञ, पारायणे, प्रवचन असं मर्यादित स्वरूप न ठेवता परमार्थाची शिकवण आचरणातून दिसली पाहिजे, याकरिता आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लोकाभिमुख चळवळीच्या माध्यमातून उभं केलेलं सामाजिक कार्य अवर्णनीय मानायला हवं.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा महामंत्र भारतातील जनतेला दिला. अर्थातच पंतप्रधान यांच्या हाकेला आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी साथ दिली नसती, तरच नवल. लाखो श्री सदस्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत प्रत्येक आठवड्याला स्वच्छतादूत म्हणून काम करू लागले. श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम करताना ज्या ज्या परिसरात हा उपक्रम आयोजित केला, तिथे फेरफटका मारल्यानंतर त्या विभागाचा चेहरामोहराच पालटला होता. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून लाखो श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत केलेली कामगिरी ही अवर्णनीय आहे आणि हे सगळं करत असताना कोणत्याही अभिनिवेश नाही. ४०० ते ५०० श्री सदस्य काम करत असताना कोणतीही गडबड, गोंधळ नाही, या चळवळीला फर्मान सोडणारा कोणताही मुकादम नाही. रस्त्यावरचा कचरा झाडून काढणारा हा पेशाने वकील किंवा डॉक्टर आहे, हे त्याला विसरायला लावणे, ही बैठक चळवळीची सत्यनिष्ठ वैचारिक शिदोरी आहे. देवळात, मंदिरात किंवा हाजी मलंग, अजमेरसारख्या ठिकाणी जाऊन खोटी भक्ती करण्यापेक्षा ज्या निरूपणातून आपण बोध घेतो तो आचरणात आणला पाहिजे, हे न सांगता ज्यांना शिकवलं जातं, अशी बैठक चळवळ याला वर्तमानातील सामाजिक प्रश्नांची उकल करण्याचं सामर्थ्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलं आहे. आज देशभरात अनेक संप्रदायांचे बाबा, गुरू हे सत्संग व दर्शन सोहळे करत असताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र कामाच्या माध्यमातून आपले सामाजिक उत्तरदायित्व कृतज्ञपणे व्यक्त करण्याचे काम सुरू ठेवलं आहे. आजकाल बरेचजण महाराज व गुरूंच्या आर्शीवादाने आपण पुढे जात आहोत, अशी खोटी समजूत घालून घेत असतात. त्यामुळे आपण केलेली चुकीची कामे महाराजांच्या आर्शीवादाने आपल्याला समृद्धी देत आहेत, असा अश्रद्ध खोटारडेपणा ते मनात बाळगत असतात. म्हणून मग ही समृद्धी कायम भितीने ग्रासलेली असते. हे वैफल्य न येण्यासाठी वस्तुनिष्ठ सत्याचा मागोवा घेऊन या देशातील नव्हे, तर या विश्वातील एकमेव अध्यात्मिक बैठक चळवळ, ज्या श्रवणातून मानवी मनामध्ये दासबोध निरूपणाच्या माध्यमातून केला जाणारा बदल हा सात्त्विक शाश्वत बदल होय. कारण बैठक चळवळीत प्रत्येक गोष्टीला एक स्वयंशिस्त आहे, त्याला वेळापत्रक आहे. श्री सदस्य करत असलेलं प्रत्येक काम हे तो देशासाठी, स्वधर्मासाठी करतो आहे अशी स्व-जाणिवेची भावना प्रत्येक श्री सदस्यापाशी आहे. हे सर्व करत असताना त्याला स्वार्थाचा, अहंकाराचा कोणताही अभिनिवेश नाही. त्याची जाहिरातबाजी नाही, त्याला मोठेपणानं मिरवण्याची कोणतीही हौस नाही. श्री सदस्य करीत असलेलं प्रत्येक काम हे सत्याच्या कसोटीवर उतरतं, ते प्रामाणिकपणाची जोड देत केलं जातं.

कारण ही मूल्य बैठक चळवळीचा आत्मा आहे. इथे श्रवणाला महत्त्वाचं स्थान आहे. जो उत्तम श्रवण करू शकतो, तोच उत्तम काम करू शकतो, असा वरवर साधा वाटणारा. पण प्रचंड ताकदीचा हा विचार मानवी जीवन आमूलाग्र बदलत आहे. आज वर्तमानात माणूस माणसापासून दुरावला जात असताना, काही प्रमाणात समाजातील असहिष्णूता वाढत चालली असताना यावर पोकळ बाता मारण्यापेक्षा ‘आधी केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे सातत्याने कार्यतत्पर राहून समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम श्री. सदस्यांची बैठक चळवळ करीत आहे. म्हणूनच तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं काही वर्षांपूर्वी गौरविल्यानंतर त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कारानंतर राज्यशासन महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. वडील आणि मुलाला असा मोठा सन्मान दिला जाण्याचं बहुदा हे एकमेव उदाहरण असावं. म्हणूनच हा मणिकांचन योग आहे. कारण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाकडून दिला जाणारा हा महाराष्ट्र भूषण हा देशभरातील लाखो श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव आहे. मला आज याची निश्चित जाणीव आहे की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र सचिनदादा धर्माधिकारी हे हेच म्हणत असतील की, माझ्या प्रत्येक श्री सदस्य हा महाराष्ट्र भूषण आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा, उमेशदादा, राहुलदादा, प्रकाशभाऊ धर्माधिकारी हे सारे धर्माधिकारी कुटुंब अध्यात्मिक वाटचालीतून देशाची व समाजाची सेवा करीत आहेत. पुढील भविष्यात नवभारताचे शिल्पकार मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विश्वनेतृत्वाखाली भारतही महासत्तेकडे वाटचाल करत असताना त्याला सत्यविचारी आणि देशावर अपंरपार प्रेम करणाऱ्या समाजमनाची गरज आहे. असं परिपक्व समाजमन हे केवळ श्री सदस्यांच्या बैठक चळवळीतूनच उभं राहू शकतं. म्हणूनच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं या देशावर, धर्मावर व अंधश्रद्धाविरहित देवावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक श्री सदस्याचा हा गौरव म्हणजे ‘ज्ञानियाचा व श्रवणाचा वेलू गेला गगनावरी’ असंच म्हणावं लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -