नवीन पनवेल : तळोजा घोट येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित झाली आहे. याप्रकरणी गावदेवी सामाजिक संस्था, घोट यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र तक्रार करून देखील याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप गावदेवी सामाजिक संस्थेने केला आहे.
तळोजा स्थित सिडको घनकचरा प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट प्रकल्प बाहेर असलेल्या शेतीमध्ये आणि नदीमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.
दूषित पाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूला असलेली शेती मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. नुकतेच घोट नदी आणि जवळ असलेल्या शेततळ्यातील मासे या प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे मरण पावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. घोट नदीच्या पात्रातून दूषित पाणी पेंधर आणि तळोजा फेस टू मधील नवीन वसाहतीच्या बाजूने वाहते. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेलापूर येथे देण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार करून देखील प्रदूषण मंडळ कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.