Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर नगरपरिषदेची ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने करभरणा ठप्प

पालघर नगरपरिषदेची ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने करभरणा ठप्प

नागरिकांचे हाल

पालघर (वार्ताहर) : एकीकडे नगरपरिषदेकडून ऑनलाइन कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असते. मात्र गेल्या काही दिवसापासून मालमत्ता कराचे ऑनलाइन भरणा केंद्र बंद असल्याने नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन भरणा केंद्राच्या माध्यमातून कर भरणे सहज सोयीचे जात होते. मात्र ऑफलाइन पद्धतीने कर भरण्यासाठी रांगा व वेळ, भाडे खर्च होत आहे.

नागरिकांना मालमत्ता कर व इतर कर भरण्यासाठी सहज सोपे जावे यासाठी नगर परिषदेच्या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन कर भरणा केला जात होता. ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र अचानक दोन-तीन महिन्यांपासून ही प्रणाली बंद पडल्याने नागरिकांना ऑफलाइन भरणा करावा लागत आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये नागरिक वेळेवर कर भरत होते. मात्र ऑफलाइनमुळे वेळेवर कर न भरता आल्याने नगरपरिषदेचेही मोठे नुकसान होत आहे.

ऑनलाइन करभरणा प्रणाली बंद असल्यामुळे पालघर शहरांमध्ये ऑफलाइन भरणा केंद्र सुरू आहेत. मात्र पालघर नगरपरिषद कार्यालय पालघरपासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने नागरिकांना भाडे खर्च करून तेथे किंवा पालघरच्या तहसीलदार कार्यालया बाजूला जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना व विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची फार गैरसोय होत असून नगरपरिषद याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच ऑनलाईन कर भरा अशा जाहिराती करून नगरपरिषद नागरिकांची दिशाभूल करीत आहे असे आरोपही नागरिकांनी केले आहेत.

नगरपरिषदेच्या संकेतस्थळद्वारे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरता येते. मात्र अनेक महिन्यापासून बंद असलेल्या या संकेतस्थळाबद्दल विचारणा केली असता तीन महिन्यापासून एकाच प्रकारचे उत्तर ऐकायला मिळत आहे. दरवेळेस लवकरच सुरू होईल असे उत्तर ऐकून नागरिक हैराण झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -