बोईसर (वार्ताहर) : वधू पक्षाने डॉक्टर असलेल्या वराची पदवी लग्नपत्रिकेत छापली नसल्याचा राग मनात ठेवून लग्नाच्या दोन दिवस अगोदर पालघर येथील डॉ. जिनीतकुमार गावड याने लग्नाला नकार दिला. यामुळे मानसिक धक्का व होणाऱ्या अपमानामुळे नववधूने पालघरमधील तिच्या राहत्या फ्लॅटच्या शौचालयात फिनाईल प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दि. २४ एप्रिलला हळदीचा कार्यक्रम होणार होता. त्यानंतर २५ एप्रिलला दोघांचेही लग्न होणार होते. वधू सिव्हिल इंजिनीयर असून ती वसई येथे नोकरीला आहे. तसेच वर जिनीतकुमार गावड हा विरारच्या एका नामांकित फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. सन २०१८ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सदर मुलगी व डॉ. गावड यांची भेट झाली. तेथून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. दि. २५ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे पालघरच्या रिसॉर्टमध्ये लग्न होणार होते. १९ एप्रिल रोजी परंपरेनुसार वधूचे वडील आणि आई हे वराचे वडील बबन गावड आणि आई विभा यांना पहिले निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले. पत्रिकेवर वधूची पदवी छापली व वराची शैक्षणिक पात्रता छापली नसल्याने वराला राग आला व त्याने रागातून ऐन लग्नाच्यावेळी लग्नाला नकार दिला, असे वधू पक्षाने तक्रारीत म्हटले आहे.
दि. २० एप्रिल रोजी वर जिनीतकुमार याने पीडितेला भेटीसाठी बोलावले आणि त्यादरम्यान त्याने तिला अटी व शर्तींची यादी दिली होती. त्यानंतरच तो तिच्याशी लग्न करेल, अशीही अट त्याने तिच्यासमोर ठेवली. मात्र अटी मान्य नसल्याचे तिने म्हटले. त्यानंतर त्याने लग्नला नकार दिला. दि. १ मार्च रोजी डहाणू येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन वराने तिच्या इच्छा नसतानाही तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने पालघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. वराच्या आई-वडिलांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा तिचा आरोप असल्याचे दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दि. २२ एप्रिल रोजी अपमानाचा सामना करत पीडितेने तिच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये जाऊन आपले जीवन संपवण्याच्या प्रयत्नात फिनाईल प्राशन केले. तिच्या पालकांनी तिला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे नेले, जेथे ती आपल्या जीवनाशी लढत आहे.
वर व वराच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, पालघर पोलिसांनी कलम ३७६ (बलात्कार), ४१७, ४२० (फसवणूक), ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे), ३२३ (दुखापत करणे) अन्वये डॉ. गावड, त्याचे आई-वडील बब्बन आणि विभा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघेही फरार आहेत. आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू असे स.पो.नि. जाधव यांनी म्हटले आहे.