Friday, August 28, 2026

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल अंतर्गत भाईंदर केशवसृष्टी येथे शैक्षणिक सहल जाणारच आहे. या सहलीला काँग्रेस, उबाठा आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केल्यानंतरही स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. निविदा न मागवता आणि स्वयंसेवक घडवणाऱ्या संस्थेच्या जागेत सहल का आयोजित करण्यात येत आहे असा आरोप करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करणाऱ्या विरोधकांना केशवसृष्टीत काय चालते आणि नेहरु सायन्स सेंटरला निविदा न मागवता सहल कशी आयोजित करता येते अशाप्रकारचे दाखले देतच विरोधकांची तोंडे स्थायी समिती अध्यक्षांनी बंद करून हा प्रस्ताव मंजूर केला.

मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिकच्या शाळांमधील इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांकरिता पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल अंतर्गत केशव सृष्टी, भाईदर, ठाणे' येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार ३०,७१४ एवढ्या अंदाजित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारही सहल आयोजित करण्यात आली आहे.

पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल " अंतर्गत केशव सृष्टी, भाईदर, ठाणे येथे शैक्षणिक सहल २०२६-२७ आयोजित करण्याच्या कामाकरीता 'केशव सृष्टी' यांच्या समवेत प्रति विद्यार्थी करता ८०२ रुपये अदा केले जाणार आहे. यामध्ये प्राथमिक विभागाच्या इयत्ता ७ वी च्या ३०३०२ अंदाजित विद्यार्थी व माध्यमिक विभागाच्या इयत्ता ७ वीचे अंदाजित ४१२ विद्यार्थी यासाठी एकूण रक्कम २.४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी ही संस्था एका वेगळ्या विचारसरणीची असून तिथे फक्त स्वयंसेवक घडवले जातात असा आरोप करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. केशवसृष्टीत सहल आयोजित न करता बीएसएचएससह चार संस्थांची नावे सांगत त्याठिकाणी सहल आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली. याला मनसेने यशवंत किल्लेदार यांनी समर्थन देत याठिकाणी सहल आयोजित करून स्वयंसेवक निर्माण करायचा का असा सवाल केला. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी मुलांची तिथे सहल तर आयोजित करतोच आहोत. पण कॉर्पोरेट कंपन्यांच्याही सहली आयोजित होतात. राणीबागेत नेवून आपण मुलांना काय दाखवत होतात, यापेक्षा याठिकाणी नेवून कार्यानुभवाचे धडे मिळणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर करायला हवा. तसेच एक दिवस नगरसेवकांची सहलही केशवसृष्टीत घडवा अशी सूचना केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी उपसूचना नामंजूर करून मूळ प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.

केशवसृष्टीत मुलांना काय पाहता येणार..

केशवसृष्टी हा परिसर हिरवागार आणि शांत असून, येथे विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आणि फुलझरे आहेत. येथे सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय (विशेषतः गोपालन), आणि मधमाशी पालन यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.

ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी येथे विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. या कॅम्पसमध्ये शालेय सहल, निसर्ग शिबिरे, आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक जीवनशैली शिकण्याची ही उत्तम जागा आहे.

हिरवेगार डोंगर आणि वाहत्या नाल्यांच्या सान्निध्यात असलेला हा परिसर २०० एकरांपेक्षा जास्त भागात पसरलेला आहे येथे ३१०० हून अधिक प्रजातींची झाडे आहेत, ज्यामध्ये साग, पाम, अर्जुन, जांभूळ, कदंब आणि बांबू यांचा समावेश आहे.आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी आणि संशोधनासाठी अनेक हर्बल वनस्पतींचे संवर्धन केले जाते. संस्थेने 'महा सूर्यकुंभ' (सोलर कुकिंग) उपक्रमात सहभाग नोंदवून जागतिक विक्रम (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला आहे.

पर्यावरण भ्रमण, कचरा व्यवस्थापन, किचनवेस्ट बायोगॅस, गोबर गॅस, गांडुळ खत निर्मिती, पेपर रिसायकलिंग ( हँड पेपर बनविणे), प्लास्टीक रिसायकल, जलव्यवस्थापन, सौरव्यवस्थापन, सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, पर्यावरण संतुलन आणि जैवविविधता या विषयांचा अंतर्भाव आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >