Friday, August 28, 2026

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

Ramdas Athawale : कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रामदास आठवलेंनी साजरे केले रक्षाबंधन; पुनर्वसन आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कामाठीपुऱ्यातील महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. महिलांनी आठवले यांच्या हातावर राखी बांधली. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. कामाठीपुऱ्यातील अनेक महिला परिस्थितीमुळे हे काम करत असल्याचे सांगत, त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी म्हटले. या महिलांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Ramdas Athawale)

“मी आज पहिल्यांदाच कामाठीपुऱ्यात आलो आहे. येथे राहणाऱ्या महिला परिस्थितीमुळे हे काम करत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधूनही महिला येथे येतात. उदरनिर्वाहासाठी त्यांना येथे राहावे लागते. आज त्यांच्या हस्ते राखी बांधून घेण्याचा मला बहुमान मिळाला,” असे आठवले यांनी सांगितले. कामाठीपुऱ्यातील महिलांना अशा परिस्थितीत राहावे लागू नये, यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पुनर्वसनासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे, असेही आठवले म्हणाले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासनही आठवले यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >