मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा भार पडणार आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपया, तर टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ होणार आहे.
नव्या दरांनुसार, रिक्षाच्या पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी सध्या 26 रुपये किमान भाडे आकारले जाते. आता हे भाडे 27 रुपये होणार आहे. रात्री 12 नंतर रिक्षाचे किमान भाडे 34 रुपये असेल. दुसरीकडे, टॅक्सीच्या पहिल्या 1.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या 31 रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसार हे भाडे 33 रुपये होणार आहे. रात्री 12 नंतर टॅक्सीचे किमान भाडे 41 रुपये असेल.
या भाडेवाढीचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नसून मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक शहरांमधील प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल आणि पालघर परिसरातही नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वाढलेल्या खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सीएनजीचे दर, वाहनांच्या देखभालीचा खर्च, विमा, परवाना तसेच परमिट नूतनीकरणाचा खर्च वाढल्याने भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, भाडेवाढीला परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली असली तरी नव्या दरांची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. शासनाचा निर्णय आणि अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच भाडेवाढीची अंतिम अंमलबजावणी होईल. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून वाढीव भाडे लागू होणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.