काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराळ भागात आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड दैना उडाली आहे. (Nepal cloudburst disaster) या पुराच्या वेगात अनेक अख्खी गावेच्या गावे वाहून गेली असून रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे (Power Projects) मोठे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
भोटे कोशी नदीला उधाण
रसुवामा बाढी।
#Rasuwa
#nepal pic.twitter.com/cPOQag4wwE
— Nirmal Prasai🇳🇵 (@NirmalPrasai5) August 26, 2026
नेपाळमधील रसुवा हा डोंगराळ जिल्हा, जिथे सुमारे ५० हजार लोकसंख्या राहते, या पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. विशेषतः रसुवा जिल्ह्यातील 'स्याप्रू बेसी' आणि 'तिमुरे' या भागांत पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. भोटे कोशी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्याने, नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी हलण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
मोठ्या जीवित व वित्तहानीची भीती
रसुवा जिल्ह्याचे प्रशासक नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक गावे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर असून वीज आणि संपर्क यंत्रणा खंडित झाल्यामुळे नक्की किती नुकसान झाले किंवा किती लोक वाहून गेले, याचा अचूक आकडा तात्काळ सांगणे कठीण आहे. मात्र, या दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जलविद्युत प्रकल्प ठप्प; वीज पुरवठा आणि वाहतूक विस्कळीत
नेपाळच्या जलसंसाधन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पुराच्या तडाख्यात भोटे कोशी नदीवर उभारलेले अनेक हायड्रोइलेक्ट्रिक (जलविद्युत) प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. याशिवाय रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. पॉवर प्रोजेक्ट्सचे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण परिसरात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून नागरिक अंधारात दिवस काढत आहेत. (NepalFlood)
उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. घरकामापासून ते ...
पंतप्रधान बालेन्द्र शाह यांचे लष्कराला बचावकार्याचे आदेश
घटनेचे गांभीर्य ओळखून नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पोलीस, लष्कर आणि आपत्ती निवारण पथकांना (Rescue Teams) प्रभावित भागात तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, नदीकाठच्या लोकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. ( NepalFlood)
तिबेटमधून उगम पावणाऱ्या नदीने पुन्हा घडवला विनाश
भोटे कोशी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. ही नदी नेपाळमधील त्रिशूली नदीला मिळते आणि पुढे भारतात 'गंडक नदी' म्हणून प्रवेश करते. गेल्या वर्षीही याच नदीमध्ये हिमनदीचा तलाव (Glacier Lake) फुटल्याने भीषण पूर आला होता. त्या पुरामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४ जण बेपत्ता झाले होते. एवढेच नाही तर नेपाळ आणि चीनला जोडणारा ऐतिहासिक 'फ्रेंडशिप ब्रिज' (Friendship Bridge) वाहून गेल्याने अनेक महिने व्यापार ठप्प झाला होता. यंदा पुन्हा एकदा याच नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.