Wednesday, August 26, 2026

Gel Nail Polish Side Effects : युरोप, ब्रिटनमध्ये बंदी असलेला 'हा' धोकादायक केमिकल भारतीय जेल नेलपॉलिशमध्ये अद्याप सुरूच! जाणून घ्या कारण

Gel Nail Polish Side Effects : युरोप, ब्रिटनमध्ये बंदी असलेला 'हा' धोकादायक केमिकल भारतीय जेल नेलपॉलिशमध्ये अद्याप सुरूच! जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : नेल आर्ट (Nail Art) आणि जेल मॅनिक्युअरचा (gel manicure Trend) ट्रेंड सध्या जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. युव्ही (UV) किंवा एलईडी (LED) दिव्यांखाली नखे धरून काही सेकंदांत वाळवली जाणारी जेल नेलपॉलिश महिलांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. मात्र, हीच जेल नेलपॉलिश कडक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या रसायनावर ब्रिटनने १५ ऑगस्टपासून पूर्णपणे बंदी घातली आहे. युरोपियन युनियनने (EU) गेल्याच वर्षी या रसायनावर रोख लावली होती. हे केमिकल पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि अवयवांवर दुष्परिणाम करू शकते, असा वैज्ञानिक दावा आहे. तरीही भारतात मात्र या रसायनाचा सर्रास वापर सुरू आहे.

काय आहे नवीन नियम आणि ब्रिटनचा निर्णय ?

ब्रिटन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 'टीपीओ' (TPO) नावाचे केमिकल असलेल्या नेलपॉलिशचे उत्पादन आणि विक्री करण्यावर बंदी आणली आहे. ब्रिटनमधील सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्यांना १५ ऑगस्टपासून या केमिकलचा नवीन साठा खरेदी करता येणार नाही. ज्या पार्लर किंवा सलूनकडे आधीपासूनच याचा साठा उपलब्ध आहे, त्यांना तो संपवण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. युरोपियन युनियनने २०२५ मध्येच अशा रसायनांना धोकादायक (CMR - कर्करोग, जनुकीय बदल किंवा प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवणारे) श्रेणीत टाकून त्यांच्या वापरावर बंदी आणली होती.

टीपीओ (TPO) नेमकं काय काम करतं ?

'ट्रायमिथाईलबेंझॉइल डायफिनाईल फॉस्फिन ऑक्साइड' म्हणजेच सोप्या भाषेत 'टीपीओ'. हे एक प्रकाश-संवेदनशील (Photo-initiator) रसायन आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा जेल नेलपॉलिश नखांवर लावून हात युव्ही दिव्याखाली ठेवला जातो, तेव्हा हे रसायन दिव्याच्या प्रकाशाशी प्रक्रिया करते आणि पातळ नेलपॉलिशला काही सेकंदांत दगडासारखे कडक करते. हे रसायन फक्त नेलपॉलिशपुरते मर्यादित नसून कापड उद्योग, लहान मुलांची खेळणी, मोबाईल फोनचे प्लास्टिक, सॅनिटरी पॅड्स आणि दातांचे डॉक्टर दात भरताना वापरत असलेल्या मसाल्यामध्येही वापरले जाते.

वैज्ञानिक चाचण्या आणि आरोग्यावरील धोके

उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून टीपीओचे धोके समोर आले आहेत. दररोज उच्च प्रमाणात (प्रति किलो वजनामागे २५० ते १००० मिग्रॅ) टीपीओ शरीरात गेल्यास उंदरांचे यकृत आणि मूत्रपिंड खराब झाल्याचे आढळले. मुख्य म्हणजे, नमुन्यांमधील नर उंदरांच्या प्रजननांगामध्ये आकुंचन (Testicular Atrophy) झाल्याचे सातत्याने दिसून आले. हालांकि, मानवी डीएनए किंवा जनुकांमध्ये बदल घडवण्याचे कोणतेही पुरावे यात आढळलेले नाहीत. तरीही, सुरक्षेचा उपाय म्हणून युरोपियन देशांनी यावर तत्काळ बंदी घातली.

सर्वसामान्य ग्राहक की सलून कर्मचारी... कोणाला जास्त धोका ?

महिने-दोन महिन्यांतून एकदा किंवा कधीतरी जेल मॅनिक्युअर करणाऱ्या सर्वसामान्य महिलांना या रसायनाचा थेट आणि मोठा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण त्यांच्या शरीरात जाणारे प्रमाण अतिशय नगण्य असते. मात्र, सलूनमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा नेल आर्टिस्ट जे दिवसभर या केमिकल्सच्या संपर्कात असतात, त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. ब्रशने पॉलिश लावणे, स्प्रे करणे किंवा रसायनांच्या वाफेचा सतत संपर्क येणे यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

युरोपमध्ये बंदी तर भारतात वापर का सुरू ?

युरोपीय देश आणि ब्रिटनमध्ये आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने कठोर नियम आहेत. एखादे रसायन केवळ हानिकारक श्रेणीत आले तरी तिथे तात्काळ बंदी लागू होते. याउलट, भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये टीपीओच्या वापरावर अद्याप कोणतीही कायदेशीर बंदी नाही. 'भारतीय सौंदर्य प्रसाधने नियम २०२०' (India's Cosmetics Rules, 2020) अंतर्गत टीपीओ हे प्रतिबंधित घटकांच्या यादीत येत नाही. त्यामुळे भारतातील सलूनमध्ये मिळणाऱ्या बहुतांश जेल नेलपॉलिशमध्ये हे केमिकल अजूनही वापरले जात आहे.

आता पुढे पर्याय काय ?

युरोप आणि ब्रिटनमधील बंदीनंतर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी टीपीओऐवजी 'टीपीओ-एल' (TPO-L) नावाचा सुरक्षित पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे. हे नवीन घटक नखे कडक करण्याचे काम व्यवस्थित करते आणि आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात आता 'TPO-Free' लेबल असलेल्या जेल नेलपॉलिश मिळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतात घरच्या घरी वापरल्या जाणाऱ्या साध्या नेलपॉलिश (ज्या वाळवण्यासाठी दिव्याची गरज नसते) वापरणाऱ्या महिलांना या रसायनाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >