मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध 'भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'वर ओढवलेल्या दुर्दैवी संकटाच्या काळात 'लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने संवेदनशील पुढाकार घेत वडीलकीचे छत्र धरले आहे. मंडळावर ओढवलेल्या दुःखात पाठीशी खंबीरपणे उभे राहत लालबागचा राजा मंडळाने एकूण २१ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती आणताना झालेल्या भीषण दुर्घटनेत मंडळाचे मानद सचिव संकेत नेवशे आणि कार्यकर्ते ब्रिजेश जोशी या दोन निष्ठावंत गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गणेशोत्सव वर्तुळात तसेच भुलेश्वर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य ...
या कठीण प्रसंगात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर दुर्घटनेत प्राण गमावलेले दिवंगत सचिव संकेत नेवशे यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबाला ५ लाख रुपये अशी प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. संकटाच्या काळात एका गणेशोत्सव मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या पाठीशी अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे लालबागच्या राजा मंडळाच्या या संवेदनशील निर्णयाचे संपूर्ण मुंबईतून आणि सर्व स्तरांतील गणेशभक्तांकडून मोठे कौतुक होत आहे.