Monday, August 24, 2026

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबईअमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून तांत्रिक त्रुटी, अग्निशमन यंत्रणेतील बिघाड, उपकरणांची देखभाल तसेच संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदाराची चूक आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही. दोष आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अमरावतीतील दुर्घटनेबाबत बावनकुळे म्हणाले की, घटनेची चौकशी सुरू आहे. अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत होती की नाही, फायर एक्स्टिंग्विशर किंवा अग्निशमन सिलेंडरची योग्य देखभाल झाली होती की नाही, स्वयंचलित यंत्रणेतील व्हॉल्व्ह योग्य वेळी सुरू झाले की नाही, छताला बसविलेले पाण्याचे फवारे कार्यरत झाले की नाही, ही सर्व तांत्रिक बाबी तपासाव्या लागतील. ही यंत्रणा कधी बसविण्यात आली, कोणत्या कंपनीने बसविली, तिची देखभाल कोणी केली आणि त्यात कोणती चूक झाली, याचाही तपास केला जाईल. “एखाद्या अधिकाऱ्याने तांत्रिक पद्धतीने चुकीची यंत्रणा बसविली असेल, कंत्राटदाराने चुकीचे काम केले असेल किंवा देखभालीत हलगर्जीपणा झाला असेल, तर अशा घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. यामध्ये कोणताही समझोता केला जाणार नाही,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अमरावतीमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी एक बालक मृत्युमुखी पडले होते, तर दोन-तीन जण जखमी झाले होते. त्या घटनेची चौकशी झाली होती; मात्र चौकशीचा अहवाल गुंडाळला गेला असल्याचा आरोपाबाबत ते म्हणाले, २०२२ मधील घटनेत नेमके काय झाले, याचीही माहिती तपासावी लागेल.

अमरावतीच्या घटनेत पोलिसांनी काही बाबी निदर्शनास आणल्या असून पोलीस आयुक्त घटनास्थळी चौकशीसाठी उपस्थित आहेत. तांत्रिक यंत्रणाही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनेच्या मुळाशी जाऊन दोषी व्यक्ती, अधिकारी किंवा कंत्राटदार कोण आहे, हे निश्चित केले जाईल. तीन बालकांचा मृत्यू होणे ही कोणालाही शोभणारी बाब नसून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे बावकुळे यांनी सांगितले. “कुठल्या वेळी कोणते वक्तव्य केले पाहिजे, हे राजकीय नेत्यांनाही कळले पाहिजे, असे ते म्हणाले. एकाच ठिकाणी असलेल्या ३६ बालकांना वाचविण्यात आले असून सहा बालकांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यामुळे अशा वेळी गरीब-श्रीमंत असा मुद्दा उपस्थित करून राजकारण करणे योग्य नाही. प्रत्येक घटनेत मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला लक्ष्य करण्याऐवजी दोषींवर कारवाई कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना पाहण्यासाठी आणि घटनेची दखल घेण्यासाठी गेले होते की राजकारण करण्यासाठी, असा सवालही त्यांनी केला.

नागपुरातील गोधनी येथे सिलेंडर गळती; पाच जणांना त्रास : नागपूरच्या गोधनी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ऑक्सिजन आणि पाणीपुरवठा योजनेशी संबंधित ठिकाणी सिलेंडर गळतीची घटना घडली. सिलेंडरमधून गॅसगळती झाल्याने तेथील चार-पाच जणांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९८ टक्के आहे. एका व्यक्तीचे सॅच्युरेशन ८८ टक्के होते; मात्र सर्वजण धोक्याबाहेर आहेत. एमजेपीच्या स्टोरेज गोदामातील प्लांटमध्ये असलेल्या एका सिलेंडरमधून गळती झाल्याने ही घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमरावती आणि नागपूर या दोन्ही घटनांची चौकशी करून अंतिम अहवाल जनतेसमोर आणला जाईल आणि ज्यांच्या चुकीमुळे घटना घडली असेल, त्यांच्यावर शासन निश्चितपणे कारवाई करेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

ओबीसी संघटनांची निवेदने स्वीकारणार; कॅबिनेट उपसमितीसमोर म्हणणे ऐकणार : ओबीसी समाजाच्या प्रस्तावित मोर्चाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, लोकशाही पद्धतीने मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. संविधानाने प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. ओबीसी संघटनांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी महसूलमंत्री म्हणून आपण तयार असून कॅबिनेट उपसमितीकडे यापूर्वी काही निवेदने आली आहेत. आणखी निवेदने प्राप्त झाल्यास सर्व संबंधितांना कॅबिनेट उपसमितीसमोर बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती पार पाडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट उपसमिती त्यांचे म्हणणे ऐकून घेईल, तर ओबीसी संघटनांचे म्हणणे आपण ऐकून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सुमारे ३५३ जाती आणि १८ पगड जातींच्या ओबीसी समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या आणि परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मागील काळात कुंभार आणि वडार समाजाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. आता पुन्हा सात निवेदने प्राप्त झाली असून संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आवश्यक ते निर्णय घेतले जातील. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या तुलनेत राज्याकडून पुरेसे अनुदान मिळत नसल्याची मागणीही करण्यात आली असून अशा विविध मागण्यांचा शासन सकारात्मक विचार करेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

‘राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद राजकीय हेतूने’ : पुण्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाच्या धर्तीवर नागपुरातही कार्यक्रम घेण्याच्या चर्चेवर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचा देशातील जनाधार कमी झाला असून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा मजबूत करण्याचा आणि युवकांचा राजकीय वापर करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद हा ‘विकसित महाराष्ट्र, विकसित भारत’ या दिशेने मार्गदर्शन करणारा होता. एआयच्या माध्यमातून जग कसे विकसित होत आहे आणि महाराष्ट्राने त्यात कसे पुढे गेले पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांना दिशा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. “युवकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांना माथे भडकवण्याचा प्रयत्न होणे दुर्दैवी आहे. युवक संमेलने घेऊन त्यांना देशाची विरासत आणि संस्कृतीचा सन्मान याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे,” असे बावनकुळे म्हणाले. वंदे मातरम्‌च्या केवळ दोन कडव्यांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “विद्यार्थ्यांना आणि युवकांना आम्ही वंदे मातरम्‌ची दोनच कडवी म्हणणार, दोनच कडवी म्हणायची, असा आग्रह काँग्रेस पक्षाचा आहे, असे सांगणार का?” असा सवाल त्यांनी केला. विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून राहुल गांधींच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली जात असली तरी तो विद्यार्थ्यांचा आवाज नसून राहुल गांधींचा राजकीय आवाज आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी युवकांचा वापर करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘युवकांचा वापर करून राजकारणाची दुकानदारी चालणार नाही’ : शरद पवार गटाकडून बेरोजगार एल्गार किंवा तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याच्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका केली. सर्वच पक्षांना आता युवक हा राजकारणासाठीचा प्लॅटफॉर्म वाटत असून त्यातून आपला राजकीय बेस मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. “युवकांना भेटेल तिथे आपले राजकीय दुकान मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवकांचे विकसित महाराष्ट्रातील स्थान काय असेल, त्यांना अधिक सक्षम कसे करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. आजचा युवक आमच्यापेक्षा कितीतरी, जवळपास २० पट अधिक प्रगत आहे. या युवकांना योग्य पद्धतीने पुढे नेले तर भारत जगातील सर्वोत्तम भारत होऊ शकतो,” असे ते म्हणाले. युवकांच्या नावाखाली राजकीय दुकानदारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दुकानदारी बंद होणार असल्याचा इशाराही बावनकुळे यांनी दिला. अशा कार्यक्रमांमधून ‘राहुल गांधींची गूंज’ होणार नाही, असेही ते म्हणाले.

महायुती समन्वय समितीला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन : महायुती समन्वय समितीच्या बैठकीबाबत बोलताना बावनकुळे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मागील बैठकीत सहा मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून वेळ घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी वेळ दिली आहे. महायुती समन्वय समितीतील सहा मंत्री दर मंगळवारी बैठक घेऊन सरकार म्हणून काय करायचे, महायुतीच्या दृष्टीने कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, यावर चर्चा करतात. डीपीसीच्या समित्या, डीपीसीचा निधी तसेच राज्यातील विविध विभागांच्या निधीबाबतचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. मंडळे आणि महामंडळांबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र काही विषयांवर वरिष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ घेण्यात आला आहे. “आम्ही पूर्ण थोडी आहोत; आमचे वरिष्ठ आहेत. काही प्रश्नांवर मार्ग काढता आला नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते,” असे बावनकुळे म्हणाले. मंत्रिमंडळाची नेहमीची मंगळवारची बैठक सोमवारी घेण्यात आल्याने आणि सोमवारी स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याने त्याला वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचा मंगळवार-बुधवार सलग प्रवास असल्याने त्यांच्या कार्यक्रमाच्या रचनेनुसार मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी घेण्यात आली. समन्वय समितीच्या सहा मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि त्यानुसार बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सहकारी संस्था निवडणुका, ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुका तसेच एसआयआरनंतर येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व घटक पक्षांना येणाऱ्या अडचणींवरही बैठकीत चर्चा होणार आहे. महायुती सरकार म्हणून काम करताना काही ठिकाणी पक्षीय पातळीवरील अडचणी असतील तर त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

कोचिंग क्लासेसच्या नावाखाली लूटमार थांबविण्यासाठी कायदा : कोचिंग क्लासेसच्या नियमनाबाबत सरकार कायदा आणत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यासाठी नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. कोचिंग क्लासेससंदर्भात पालकांच्या विविध मागण्या आणि तक्रारी असून त्याचा विचार करण्यात येत आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूटमार होऊ नये, खोटे वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसकडे वळविले जाऊ नये, यासाठी आवश्यक नियम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोचिंग क्लासेसची आवश्यकता असली तरी त्यामध्ये आवश्यक बदल करून त्यांचे नियमन केले पाहिजे. शिक्षणासाठी पैसा खर्च करण्याची क्षमता नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी, या दृष्टीने सुधारणा आवश्यक असल्याचे बावनकुळे म्हणाले.

५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदाची पदोन्नती : महसूल विभागातील पदोन्नतीबाबत महत्त्वाची घोषणा करताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील ५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून दर्जा देण्यात आला आहे, तर २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. महसूल विभागाच्या प्रवासातील हा महत्त्वाचा दिवस असून प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या पदोन्नती महत्त्वाच्या असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >