केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले कर्तव्य बजावत माणुसकीचे उदाहरण घालून दिले. लग्नसमारंभात केटरिंग टीममधील दोन महिला कर्मचारी अचानक आजारी पडल्या. यावेळी वधू डॉ. शिरिन सुबैर यांनी लग्नाचा पोशाख बाजूला ठेवत तातडीने दोघींना प्रथमोपचार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कन्नूर जिल्ह्यातील पानूर येथील रहिवासी डॉ. शिरिन सुबैर यांचा डॉ. रिझाझ यांच्यासोबत विवाहसोहळा सुरू होता. यावेळी केटरिंग टीममधील एका महिलेला अचानक नाकातून रक्तस्त्राव झाला, तर दुसरी महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. (Kerala Doctor Viral video)
बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला ...
समारंभात शिरिन डॉक्टर असल्याची माहिती उपस्थितांना होती. त्यामुळे दोन्ही महिलांची प्रकृती बिघडल्याचे समजताच कोणीतरी शिरिन यांना मदतीसाठी बोलावले. लग्नाचा पोशाख परिधान केलेल्या शिरिन यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघींकडे धाव घेतली आणि त्यांना आवश्यक प्रथमोपचार दिला.
नाकातून रक्तस्त्राव झालेल्या महिलेला पुढे वाकून नाकाला 10 ते 15 मिनिटे दाब देण्यास सांगण्यात आले. तर चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या महिलेला झोपवून तिचे पाय उंच करण्यात आले. (Viral Video)
‘मी डॉक्टर आहे, त्यामुळे जे आवश्यक होतं ते केलं’
या घटनेबाबत शिरिन यांनी सांगितले की, समारंभातील लोकांना आपण डॉक्टर असल्याचे माहीत होते, त्यामुळे त्यांनी मदतीसाठी बोलावले. परिस्थिती पाहिल्यानंतर जे आवश्यक होते, ते त्यांनी केले.
शिरिन सध्या ओट्टापलम येथील वल्लुवनद रुग्णालयात Emergency Medicine मध्ये एमडीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार आणि सीपीआरचे ज्ञान असणे किती महत्त्वाचे आहे, यावरही भर दिला.
‘व्हिडिओ बनवला जातोय, याची कल्पनाच नव्हती’
शिरिन यांनी सांगितले की, त्या महिलांना मदत करत असताना कोणीतरी व्हिडिओ शूट करत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच त्यांना याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे शिरिन यांचे पती डॉ. रिझाझ हे देखील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. ते आंध्र प्रदेशात अस्थिरोगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या प्रसंगावरील तातडीच्या प्रतिसादाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.