Nashik Kumbhmela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असून, त्यांच्या सोयीसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांपैकी तब्बल ८५ टक्के कामे कायमस्वरूपी, तर केवळ १५ टक्के कामे कुंभमेळ्यापुरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा पुढील अनेक वर्षे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
कुंभाची कामे ८५ टक्के कामे कायमस्वरूपी
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नागरिकांना सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकाचवेळी हाती घेण्यात आलेल्या या विविध कामांमुळे खड्डेमय रस्ते, नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील खोदकामे, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर आदी विविध कारणांवरून सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतआहे. या पार्श्वभूमीवर, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी या कामांमुळे नागरिकांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याचे मान्य करीत ही कामे कुंभमेळ्यापुरतीच मर्यादित न राहता ती नाशिक जिल्ह्याच्या पुढील दीड ते दोन दशकांच्या विकासाचा पाया ठरणार असल्याचे नमूद केले.
Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना स्थानिकांचा तीव्र विरोध होत असल्याने ...
सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) २२ हजार ४२५ कोटी ३९ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास, महापारेषण आणि जिल्हा परिषद यांच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातूनही ८ हजार ७६१ कोटी ५४ लाख रुपयांची कामे केली जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, महापालिका आणि एमएसआयडीसीच्या माध्यमातून रस्ते, वाहतूक, रेल्वे, पाणी, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प राबवले जात आहेत.
कुंभमेळ्यानंतरही सुविधांचा फायदाच होणार
धार्मिक परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांचा समन्वय साधून नाशिक-त्र्यंबकेश्वरला देशाची प्रमुख आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) यांनी सांगितले. कुंभमेळ्यानंतरही या सुविधा नागरिक आणि पर्यटकांसाठी उपयोगी ठरतील, असा दावा कुंभमेळा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.