Saturday, August 22, 2026

Mumbai Crime : तृतीयपंथी असल्याचं सोंग घेत घरात शिरला; पवईत महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड!

Mumbai Crime : तृतीयपंथी असल्याचं सोंग घेत घरात शिरला; पवईत महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड!

Mumbai : मुंबईतील पवई परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नजर काढण्याच्या बहाण्याने एका 28 वर्षीय नराधमाने तृतीयपंथी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला आणि २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद केले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:२० वाजता आरोपी अनिल शेषराव शिंदे हा पवईतील एका इमारतीत पोहोचला. त्याने आपण तृतीयपंथी असल्याचे भासवून सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन केला आणि इमारतीत प्रवेश मिळवला. त्यानंतर तो तिसऱ्या मजल्यावर गेला. तक्रारदार महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्यावर 'नजर' किंवा वाईट प्रभाव असल्याचा बनाव आरोपीने रचला. ही 'नजर' दूर करण्याचे सांगून त्याने महिलेचा विश्वास जिंकला, ज्यामुळे महिलेने त्याला घरात प्रवेश दिला. घरात आल्यावर आरोपीने महिलेवर पाणी शिंपडले, डोक्यावर हात ठेवला आणि नंतर बेडरूममध्ये नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्ती व अत्याचार केला. घडून गेलेल्या या भयानक प्रकारानंतर आरोपी तिथून पसार झाला आणि जाताना महिलेकडून २०० रुपयेही घेतले.

पोलिसांची धडक कारवाई: १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले

महिलेने मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता पोलीस ठाण्यात गाठून तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीने गुन्ह्यानंतर साडी परिधान करून रिक्षाने पळ काढल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथकाने पवईपासून कळव्यापर्यंतच्या प्रवासाचा माग काढण्यासाठी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गुप्त माहिती आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कळवा येथील गोलाई नगर झोपडपट्टीत सापळा रचून आरोपी अनिल शेषराव शिंदे याला अवघ्या चार तासांत अटक केली. सध्या त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा भीक मागणाऱ्या बहुरूपी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये. तसेच, कोणतीही संशयित हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० आणि ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >