Friday, August 21, 2026

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता, प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाच्या आगमनानिमित्त लाखो नागरिक रात्रीच्या वेळीही मोठ्या संख्येने बाहेर पडतात. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर लोकल रेल्वे आणि मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर (हेडवे) कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण येतो. दिवस आणि रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी पाहता, गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर कोणतीही तांत्रिक कामे वा नियमित मेगाब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक घेऊ नयेत, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. तसेच, रात्री उशिरा गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुविधा

प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करून प्रवाशांच्या सुरक्षेसह गर्दी व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भाविकांना तिकीट काढताना रांगेत उभे राहावे लागू नये, म्हणून मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स, डिजिटल आणि क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे देखील सेवा सुरू असेपर्यंत सतत उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >