Thursday, August 20, 2026

Nashik : श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन करा, सुरक्षिततेसोबत पाणी-वीज आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

Nashik : श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन करा, सुरक्षिततेसोबत पाणी-वीज आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

Nashik : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, स्वच्छतागृहे आणि वाहतूक अशा मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी दिले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गासह गंगाद्वार, वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वर शहरात आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य पथके, रुग्णवाहिका व दिशादर्शक फलक उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रदक्षिणा आरोग्य पथके नियुक्त करा

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, श्रावण सोमवारनिमित्त भाविक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतात. या पार्श्वभूमीवर या मार्गावर आरोग्य पथके नियुक्त करावीत. स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी तसेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. गंगाद्वार येथे रुग्णवाहिका व आरोग्य पथक उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी. वाहनतळांच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृहे आणि आरोग्य पथके उपलब्ध करून द्यावीत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शहरात दैनंदिन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन

यावेळी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी सांगितले की, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभाग एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पहिल्या सोमवारी गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. तसेच श्रावण महिना संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरातील जुने रुग्णालयही सुरू ठेवण्यात येणार आहे. तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले की, तालुका प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाच हजार भाविकांच्या क्षमतेचा मंडप घालण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्रीमती अहिरे आणि नगराध्यक्षा श्रीमती तुंगार यांनीही विविध सूचना केल्या.

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गिते, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर पोलिस अधीक्षक विमला, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >