वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे प्रेमसंबंधातून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह गावाजवळील विहिरीत फेकून देण्यात आला. विशेष म्हणजे, हत्येनंतर पत्नीनेच पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र, पोलिसांच्या तपासात या हत्याकांडाचा उलगडा झाला. (Murder)
संतोष पांडुरंग कैकाडे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या तपासानुसार, संतोष यांची पत्नी सपना कैकाडे हिचे संतोष यांचेच चुलत भाऊ शुभम कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात संतोष अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. (Wardha Crime)
१६ ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान संतोष यांच्या राहत्या घरी हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सपना हिने शुभम कैकाडे आणि त्याचे दोन साथीदार सचिन बसुणे व प्रशांत करपे यांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह गावाजवळील बोबडे यांच्या विहिरीत फेकण्यात आला. (Crime News)
हत्येनंतर पत्नीनेच दाखल केली मिसिंग तक्रार
हत्येचा प्रकार लपवण्यासाठी संतोष बेपत्ता असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर सपना हिनेच वडनेर पोलीस ठाण्यात संतोष बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना काही बाबींवर संशय आला. संशयितांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर प्रेमसंबंधाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. (Wife Killed Husband)
या प्रकरणी शुभम रमेशराव कैकाडे (३०), सचिन प्रभाकर बसुणे (३०), प्रशांत रमेश करपे (३६) आणि सपना संतोष कैकाडे (३६) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचा कट कसा रचला, प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका काय होती आणि इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. (Hubsband Murder)