Tuesday, August 18, 2026

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका

मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षभरात पार पडण्याची शक्यता बऱ्यापैकी मावळली असून, या सर्व निवडणुका आता पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्येच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आयोगाच्या या भूमिकेमुळे आणि कायदेशीर बाबींमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. (Local Body Elections)

राज्यात मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या २११ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा जानेवारी २०२७ पूर्वी होण्याची चिन्हे धूसर झाली आहेत. सध्या राज्यभरात मतदार याद्यांच्या 'एसआयआर' मोहिमेचे काम वेगाने सुरू असून, या मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी येत्या २७ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकांची कार्यवाही सुरू करता येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या याद्या या विधानसभा मतदारसंघनिहाय असणार असून, त्यानंतर २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या हद्दीनुसार त्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागेल. या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यांची पूर्तता करण्यासाठी नोव्हेंबर महिना संपण्याची शक्यता आहे. (Local Body Elections)

या सर्व तांत्रिक प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाला डिसेंबर महिन्यातच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित करावा लागेल, ज्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पुढील वर्षात सरकणार आहे. दुसरीकडे, राज्यातील १०५ नगरपंचायतींची मुदत आगामी फेब्रुवारी २०२७ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास फेब्रुवारी २०२७ मध्येच संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया एकत्र पार पडू शकते. (Local Body Elections)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >