Monday, August 17, 2026

Sensation in Pune : खर्चासाठी पैसे हवे होते म्हणून १९ वर्षीय तरुणाने रचले स्वतःच्याच अपहरणाचे नाटक; ५ लाखांची मागणी अन् पोलिसांनी काही तासांतच फोडले बिंग!

Sensation in Pune : खर्चासाठी पैसे हवे होते म्हणून १९ वर्षीय तरुणाने रचले स्वतःच्याच अपहरणाचे नाटक; ५ लाखांची मागणी अन् पोलिसांनी काही तासांतच फोडले बिंग!

Pune : पुण्यामधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. हाताला काम नाही, घरून मिळणारे पैसे अपुरे पडतात आणि दैनंदिन खर्च भागत नाही; या आर्थिक विवंचनेतून एका १९ वर्षीय तरुणाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. कुटुंबीयांना ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ पाठवून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकारामुळे उत्तर प्रदेश आणि पुणे अशा दोन राज्यांच्या पोलिसांची मोठी धावपळ उडाली. मात्र, पुणे पोलिसांनी अत्यंत तप्तरता दाखवत तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच या संपूर्ण बनावाचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. तो काही कारणास्तव पुण्यामध्ये आला होता. पुण्यात राहत असताना त्याच्याकडे कोणतेही नियमित काम नव्हते, ज्यामुळे तो तीव्र आर्थिक अडचणीत सापडला होता. दैनंदिन खर्चासाठी तो वारंवार घरच्यांकडे पैसे मागितला करायचा. मात्र, घरून मिळणाऱ्या मर्यादित पैशांमध्ये त्याचा खर्च भागत नव्हता. अधिकचे पैसे मिळवण्याचा कोणताही मार्ग न सुचल्याने त्याने अत्यंत टोकाचा विचार करत स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला.

रडतानाचा व्हिडिओ पाठवून कुटुंबाला घातले साकडे

कुटुंबीयांना आपला मुलगा खरोखरच संकटात असल्याचा आणि त्याचे अपहरण झाल्याचा पक्का विश्वास बसावा, यासाठी ओम प्रकाशने स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडताना दिसत होता. "मी पुण्यात अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहे आणि सुखरूप सुटका हवी असल्यास तातडीने ५ लाख रुपये द्यावे लागतील," असा संदेश त्याने आपल्या मोठ्या भावासह इतर कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला. हा व्हिडिओ पाहताच उत्तर प्रदेशमधील त्याचे कुटुंबीय हादरून गेले. मुलगा खरोखरच अपहरणकर्त्यांच्या विळख्यात अडकला आहे, असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी तात्काळ उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

मध्यरात्री पोलिसांची शोधमोहीम सुरू

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पुणे पोलिसांना याची कल्पना दिली. एका तरुणाचे पुण्यात अपहरण झाल्याचे आणि ५ लाखांच्या खंडणीची मागणी होत असल्याचे समजताच पुणे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. १७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक तसेच अधिकारी व कर्मचारी या शोधमोहिमेत उतरले. उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या ओम प्रकाशच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचे तांत्रिक विश्लेषण करत लोकेशन शोधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

लोकेशनमुळे उघड झाले सत्य

तांत्रिक तपासादरम्यान संबंधित मोबाईलचे लाईव्ह लोकेशन पुण्यातील खडकी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांसह गस्तीवरील अधिकारी आणि मार्शल तातडीने खडकी भागात पोहोचले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी परिसरातील 'क्राउन प्लाझा लॉजिंग' येथे धाव घेत तपासणी केली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांसमोर जे चित्र होते, ते पाहून ते अचंबित झाले. ज्या तरुणाची सुटका करण्यासाठी आणि अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रीपासून संपूर्ण शहरात शोध घेत होती, तोच ओम प्रकाश त्या लॉजमध्ये अत्यंत सुखरूप आणि आरामात बसलेला होता. तिथे दूरदूरपर्यंत कोणतेही अपहरणकर्ते किंवा गुन्हेगार नव्हते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, बिंग फुटले. पैशांसाठी आपणच हा सगळा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. अखेर, उत्तर प्रदेश आणि पुणे पोलिसांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे एका खोट्या अपहरणाचे नाटक काही तासांतच उघडे पडले असून, पोलिसांनी मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >