Monday, August 17, 2026

Monsoon and Snakebites : महाराष्ट्रातील ४ प्रमुख विषारी साप, ओळख आणि तातडीचे उपचार

Monsoon and Snakebites : महाराष्ट्रातील ४ प्रमुख विषारी साप, ओळख आणि तातडीचे उपचार

पावसाळा सुरू झाला की निसर्ग हिरवाईने नटतो, पण याच काळात बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे किंवा निवाऱ्याच्या शोधात साप मानवी वस्तीजवळ येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. साप दिसला म्हणजे घाबरून न जाता योग्य ती माहिती आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात सर्पदंशाच्या बहुतांश घटनांसाठी चार प्रमुख विषारी साप जबाबदार असतात.

महाराष्ट्रातील ४ प्रमुख विषारी साप

१. नाग (Indian Cobra): या सापाच्या मानेजवळ स्पष्ट फणा असतो. याचे विष प्रामुख्याने मज्जासंस्थेवर (Neurotoxic) परिणाम करते, ज्यामुळे गंभीर परिस्थितीत श्वसनावरही परिणाम होऊ शकतो.

२. मण्यार (Common Krait): हा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सक्रिय असणारा साप आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करतो. सुरुवातीला याची लक्षणे कमी दिसत असली, तरी हा दंश अत्यंत घातक ठरू शकतो.

३. घोणस (Russell's Viper): शरीरावर साखळीसारखा नमुना (Chain pattern) असलेला हा साप अतिशय विषारी आहे. याचे विष रक्ताभिसरण संस्थेवर आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत गंभीर बिघाड घडवून आणते.

४. फुरसे (Saw-scaled Viper): आकाराने तुलनेने लहान असला तरी हा अत्यंत चपळ आणि विषारी साप आहे. याचा दंशदेखील शरीरासाठी गंभीर ठरू शकतो.

सर्पदंश झाल्यास काय करावे?

फक्त दातांच्या खुणा, सूज किंवा वेदना पाहून सर्पदंश विषारी आहे की नाही हे ठरवता येत नाही, कारण काही विषारी दंशांमध्ये सुरुवातीला स्थानिक लक्षणे अगदी कमी असू शकतात. त्यामुळे साप चावल्याचा संशय आल्यास लक्षणांची वाट न बघता खालील उपाय करावेत:

  • शांत राहा: रुग्णाला अजिबात घाईघडू किंवा घाबरू देऊ नका.

  • हालचाल टाळा: रुग्णाला धावू देऊ नका आणि शक्य तितक्या कमी हालचाली करा. दंश झालेला हात किंवा पाय स्थिर ठेवा.

  • दागिने काढा: हातावर किंवा पायावर घड्याळ, अंगठी, बांगडी किंवा घट्ट कपडे असल्यास सूज येण्यापूर्वी ते तात्काळ काढून ठेवा.

  • तातडीने रुग्णालय गाठा: रुग्णाला विनाविलंब जवळच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा. 'अँटीव्हेनम' (Anti-snake venom) ची गरज आहे की नाही, हे वैद्यकीय तज्ज्ञ ठरवतील.

या चुका अजिबात करू नका!

  • जखम ब्लेडने कापू नका.

  • तोंडाने विष चोखून काढण्याचा प्रयत्न करू नका.

  • जखमेवर घट्ट दोरी किंवा टूर्निकेट बांधू नका.

  • जखमेवर कोणतेही घरगुती पदार्थ, औषध किंवा रासायनिक पदार्थ लावू नका.

  • मांत्रिक, झाडफूक किंवा अप्रमाणित उपचारांमध्ये मौल्यवान वेळ वाया घालवू नका.

प्रतिबंध आणि घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात सापांपासून बचावासाठी घराभोवतीचा कचरा, लाकूड, दगड किंवा विटांचे ढीग साचू देऊ नका. उंदरांचा वावर कमी ठेवा, रात्री बाहेर पडताना टॉर्चचा आवर्जून वापर करा आणि जमिनीवर झोपताना विशेष काळजी घ्या. साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका; स्वतःपासून सुरक्षित अंतर राखून तात्काळ स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा.

भीती नाही, तर सावधगिरी आणि योग्य माहितीच आपला खरा जीव वाचवू शकते!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा