Monday, August 17, 2026

Devendra Fadnavis : अनेकांना मी दिल्लीत जावेसे वाटत असले, तरी मी महाराष्ट्रातच राहणार!

Devendra Fadnavis : अनेकांना मी दिल्लीत जावेसे वाटत असले, तरी मी महाराष्ट्रातच राहणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : "अनेक लोकांना मी दिल्लीत जावेसे वाटत असले, तरी मी महाराष्ट्रातच आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत राहणार आहे," असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. आपल्या दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण प्रशासन, महत्त्वाचे प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेली मदत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विस्तृत पत्र दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो आणि नदी जोड प्रकल्पांसह विविध टप्प्यांवर असलेल्या विकासकामांना गती देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. ५४ हजार कोटी रुपयांच्या उत्तन ते विरार या महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पासाठी जपानच्या 'जायका' संस्थेकडे पाठपुरावा करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. हा प्रकल्प मोठा असल्याने जायकासोबत आणखी एका बहुराष्ट्रीय संस्थेला जोडून या प्रकल्पाचे निधी संकलन करता येईल का, याविषयी केंद्र सरकारने दिलेला सल्ला राज्याने मान्य केला असून, त्यावर काम सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन प्रलंबित पर्यावरणीय परवानग्या त्वरित देण्याची विनंती त्यांनी केली. यादव यांनी तात्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेंद्रा-बिडकीन येथे अतिरिक्त ८ हजार एकर जमिनीचे संपादन केले जात असून डीएमआयसी अंतर्गत विकसित या वसाहतीसाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच दिल्ली-नागपूर कॉरिडॉरवर नागपूरजवळील सावनेर येथे ६ हजार एकर जागेवर औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. याशिवाय दिघी येथे ६ हजार एकर जमीन संपादित झाली असून केंद्राच्या एकरकमी निधीतून रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरवर नवी एमआयडीसी उभारण्याचा प्रस्तावही केंद्राकडे ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे मेट्रो ३ च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पुणे येथे टाटा समूहासोबत विकसित करण्यात आलेल्या आणि देशातील नव्या धोरणानुसार सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील पहिल्या 'पुणे मेट्रो ३' चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सध्या या मेट्रोची चाचणी (टेस्टिंग) सुरू असून, या मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधानांकडून लवकरात लवकर तारीख मिळवून उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर टोलेबाजी

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याबाबत रोहित पवार यांच्यासह विरोधकांनी केलेल्या टीकाटिप्पणीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरी चर्चा होतात. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्यांना फुगे किंवा पतंग उडवायचे आहेत, त्यांना उडवू द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. अनेक लोकांना मी दिल्लीत जावेसे वाटत असले तरी मी मुंबईतच आहे", असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा