- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
सहलीवर गेलेले शिवम व त्याचे मित्र आता परत निघाले होते. ते महादेवाच्या मंदिराची टेकडी उतरून जवळच्या वेदपूर ह्या तीर्थक्षेत्राच्या रस्त्यावर लागले होते. चालता चालता शिवम, तू बोलताना थोड्या वेळापूर्वी भूकंपाचा उल्लेख केला.
मग हा भूकंप कसा होतो ह्याची माहिती तुझ्याजवळील त्या पुस्तकात असेल, तर त्याचीही कल्पना दे आम्हाला. कपिल विचारू लागला.
“सांगतो.” शिवमने सांगण्यास सुरुवात केली, “भूपृष्ठाचे एकाएकी क्षणभर कंपन होणे म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग अचानक काही क्षण थरथरणे किंवा हादरणे ह्याला भूकंप असे म्हणतात. आपली पृथ्वी थंडावताना तिचे बाह्यकवच हे आधी थंड होत होत घन होत कडक बनत गेले. त्यावेळी आंतरकवचामध्ये वेगवेगळे स्तर वा पट्टे तयार झालेत. त्यांना भूस्तर वा भूपट्ट असे म्हणतात. पण त्या स्तरांच्या अतिशय आतील गाभा हा अजूनही अत्यंत उष्ण अशा अर्ध घनद्रवरूपात आहे. हा द्रवरस म्हणजे पृथ्वीच्या पोटातील तप्त वायू, खनिज पदार्थांचा व वितळलेल्या खडकांचा अतिउष्ण असा द्रवपदार्थ आहे. त्यालाच शिलारस असे म्हणतात”
“शिलारस नाही, लाव्हारस म्हणतात.” कुणालने मध्येच आपले ज्ञान पाजळले.
“बरोबर आहे, त्याला शिलारसच म्हणतात.” शिवम म्हणाला, “मित्रांनो, पूर्णपणे ऐकून घ्या. ह्या शिलारसामुळे पृथ्वीच्या पोटात सतत हालचाली होत असतात. त्यांनीच पृथ्वीच्या आंतरस्तरांमध्ये कंपने निर्माण होतात. ह्या हालचाली जर अतिशय तीव्र स्वरूपाच्या झाल्यास त्यांचे जमिनीच्या आंतरभागाला धक्के बसतात व ते धक्के भूपृष्ठावरही जाणवतात.
हे धक्के जर खूप जोराचे असल्यास त्याने जमिनीचा पृष्ठभाग वरखाली, मागेपुढे होतो, जमिनीला काही ठिकाणी भेगासुद्धा पडतात. त्यालाच भूकंप झाला असे म्हणतात.”
शिवम पुढे बोलू लागला, “पृथ्वीच्या आतील विविध स्तरसुद्धा हे सतत हलत, सरकत असतात, एकमेकांना घासले जात असतात. त्यामुळे त्यांतील खडकांवर ताण निर्माण होतो. हा ताण अति झाला की ते भंगतात. भंगलेल्या खडकांचे तुटलेले भाग थोडेसे खालीवर किंवा पुढेमागे होतात. खडकांचे भंगणे हे अचानक व एकदम होते त्यामुळे त्यांचा भूपृष्ठाला जोरदार धक्का बसतो नि भूकंप होतो. तसेच हे सरकणारे थर जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यांच्यामध्ये ज्या विध्वंसक घडामोडी घडतात त्यामुळेही भूकंप होतो.” शिवम सांगत होता, “पृथ्वीवर पडणारे पावसाचे पाणी, नद्यांचे पाणी, समुद्राचे पाणी हे झिरपत झिरपत जमिनीमध्ये आत आत खूप खोलवर जाते. तेथील उष्णतेने त्याची वाफ होते. ही वाफ जमिनीबाहेर येण्यासाठी कोठून तरी मार्ग शोधत असते. ज्याठिकाणी पृथ्वीचे कवच कमकुवत असते त्याला फाडून तेथून ती बाहेर पडते. वाफ वर येत असताना तिचा दाब प्रचंड असतो. त्यामुळे तेथील जमीन हादरते व काही ठिकाणी जमिनीला तडा जाताे व भूकंप झाला असे म्हणतात.”
“पण भूकंप हे पृथ्वीवरील काही विशिष्ट जागीच का होतात?” कपिलने शंका उकरून काढली.
“भूगर्भातील प्रखर उष्णतेमुळे जमिनीच्या वा सागराच्या खोलवर भागात सतत खडकांचे भंगणे, त्यांचे आपापसातील घर्षण, ज्वालामुखीचे वारंवार धक्के बसणे अशा विषम प्रक्रिया सतत सुरू असतात. त्या प्रक्रिया ज्या ठिकाणी वारंवार होतात तेथील भूकवच हे कमकुवत झालेले असते. त्यामुळे नेहमी त्याच विशिष्ट जागीच भूकंप जास्त होत असतात.” शिवमने त्याचे शंकानिरसन केले.