लढाई

- कथा; रमेश तांबे


एकदा एका जंगलात प्राण्या-पक्ष्यांची सभा भरली होती. सभेपुढचा गंभीर विषय होता या “माणूस” प्राण्याचा बंदोबस्त कसा करायचा. कारण ही माणसं जंगलात येतात, प्राण्या-पक्ष्यांची शिकार करतात, त्यांना पकडून नेतात, झाडं तोडतात, पक्ष्यांच्या घरट्यांची नासधूस करतात. असे खूप सारे गंभीर प्रश्न सभेपुढे होते. त्यासाठी शेकडो प्राणी, पक्षी एका मोकळ्या मैदानात जमले होते.


जंगलचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा गरुड, सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रमुख नागराज यांना मानाप्रमाणे व्यासपीठावर स्थान दिले होते. व्यासपीठाच्या समोर मध्यभागी सरपटणारे प्राणी, डाव्या बाजूला पक्षी, तर उजव्या बाजूला सगळे प्राणी जमले होते. सगळ्यांच्या आवाजाने नुसता गोंधळ उडाला होता. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता. पण बोलण्याशिवाय ते दुसरे काही करू शकत नव्हते. कारण मानव प्राणी हा जबरदस्त बुद्धिमान, हुशार आणि ताकदवान होता. सिंहराजांनी व्यासपीठावर येताच एक मोठी गर्जना केली. त्या गर्जनेने सारे जंगल दणाणून गेले. जमलेले सारेच प्राणी-पक्षी गप्प बसले. सभा सुरू झाली. सूत्रसंचालक म्हणून ससोबा बोलायला आले. ते म्हणाले, “मी मुळातच भित्रा. ज्याला त्याला घाबरतो, लगेच सुरक्षित जागी लपतो. पण तुम्ही तर सारे धीट, ताकदवान, चपळ आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरात, जंगलात घाबरून राहाता. हे मात्र चुकीचं आहे. ज्यांनी आम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे तेच घाबरतात, लपून बसतात! आता यावर तोडगा काढला पाहिजे. नाहीतर तो दोन पायांचा माणूस प्राणी आपले अस्तित्व संपून टाकेन.”


मग पक्ष्यांचा प्रतिनिधी म्हणून पोपट म्हणाला, “खरेच खूपच गंभीर प्रकरण आहे. माणूस प्राण्याला आपण धडा शिकवलाच पाहिजे.” त्यानंतर प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणून लांडगा बोलायला उभा राहिला. त्यानेदेखील जंगलात येणाऱ्या माणसांवर आपण सगळ्यांनी एकाच वेळेला हल्ला केला पाहिजे असे मत मांडले. मग सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वतीने साप म्हणाला, “या दोन पायाच्या माणूस प्राण्याला त्याच्या घरात जाऊन त्रास दिला पाहिजे. तेव्हा त्याला कळेल की दुसऱ्याच्या घरात आपण जाऊ नये, त्यांना त्रास देऊ नये.”


सापाची ही कल्पना सर्वांनाच आवडली. मग जंगलचे राजे सिंह म्हणाले, “मी सर्वांची मते जाणून घेतली आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, हा जो माणूस नावाचा प्राणी आहे, हा दिसतो खूप बारीक आणि दुबळा. पण तो अत्यंत हुशार आहे, ताकदवान आहे. त्याच्याशी आपण समोरासमोर लढू शकत नाही. त्यासाठी छुपे युद्धच आपण खेळले पाहिजे. त्याचे नुकसान होईल अशी आपण एक योजना केली पाहिजे. म्हणून सापाने जे म्हटले ते मलाही पटले आहे. त्याच्या घरातच आपण घुसलं पाहिजे.


सिंह पुढे म्हणाला, पक्ष्यांनी त्यांच्या तयार शेतावर धाडी टाकून फक्त धान्य खावे. तेथील किड्यांना जराही तोंड लावू नये. किड्यांची संख्या वाढून त्याच्या पिकांची नासधूस होईल. वाघ, बिबटे यांसारख्या प्राण्यांनी रात्रीच्या वेळी लोकवस्तीत प्रवेश करावा. ज्यामुळे दहशतीमुळे रात्रीच्या वेळी त्यांना फिरणे मुश्कील झाले पाहिजे. सरपटणाऱ्या प्राण्यांनीदेखील त्यांच्या घरात शिरून त्यांना त्रास द्यावा.


सर्वांनी सिंहराजांच्या बोलण्याला दुजोरा दिला. पक्ष्यांनी कलकलाट करून, प्राण्यांनी माना हलवून, सरपटणाऱ्या प्राण्यांनी आपापल्या शेपट्या आपटून होकार दिला. या सभेनंतर गावागावात जंगली प्राण्यांची संख्या वाढली. साप, नाग घराघरात शिरू लागले. पक्ष्यांनी बहिष्कार टाकल्याने टोळधाडीत शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले. पण माणूस त्यावर वेगळाच उपाय शोधू लागला. आपण जंगल आणि जंगलातले प्राणी वाचवले पाहिजेत हे त्याच्या अजूनही लक्षात येत नाही.

Comments
Add Comment

या ध्वजाखाली या...

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर "या ध्वजाखाली या, सारे एकत्र या, भारतमातेच्या चरणी, कर्तव्याची शपथ

पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सारी मुले गप्पागोष्टींमध्ये रमत होती.“पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत?” अमोलने

मोफत

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव काही कमी होत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन

आत्मविश्वासाचा मंत्र

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर स्वतःवर विश्वास असेल, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते.” मनुष्याच्या

अडगळ

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ दरवर्षीप्रमाणे मित्राच्या घरी होळीला गेलो. आम्ही सर्व कॉलेजचे मित्र एक एक सण

नदीची गोष्ट

- कथा; रमेश तांबे विजयला फिरण्याचं खूप वेड होतं. शाळेला सुट्टी असली की निघाला विजय फिरायला! पण त्याचं फिरणं होतं