दैव

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ


पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घराबाहेर पडताना आठवणीने आपण सर्व हातात बाळगतो ती वस्तू म्हणजे छत्री. या काळात वातावरणात आल्हाद गारवा असतो. जिथे जिथे माती आहे तिथे हिरवळ अनुभवायला मिळते आणि अधिकच्या हिरवळीसाठी या काळात खास सहली काढल्या जातात. पावसाळी सहलीचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. कुठे धबधब्याखाली लोक भिजतात, तर कुठे नदीकिनारी, समुद्रकाठी जाऊन पावसाचा आनंद घेतात. आज सकाळी खिडकीच्या गजाआडून पावसाचा आनंद घेताना अचानक दूरवर एक भव्य छत्री दिसली. समोरच्या बिल्डिंगमध्ये खाली रेस्टोरा आहे आणि बहुधा मालकाचे कुटुंबीय वरच्या एखाद्या मजल्यावर राहत असावेत, तर आपल्या गच्चीवर त्यांनी छोटीशी बाग फुलवली आहे आणि त्या बागेत एक मस्त छत्री बसवलेली दिसली. बराच वेळ मी त्या नव्या कोऱ्या सप्तरंगी छत्रीकडे पाहत होते. मनात विचार आला या सप्तरंगी छत्रीमागे जर सप्तरंगी इंद्रधनुष्य अचानक अवतरले तर कसे दिसेल? फक्त विचारानेच माझ्या डोळ्यांसमोर सृष्टीतील सप्तरंग दिसू लागले. इतक्या सुंदर रम्य वातावरणात हातात वाफाळलेल्या आल्याचा कडक चहाचा कप घेऊन मी धुंदीत असताना, माझी मदतनीस माझ्या घरातील भांडी घासण्याचे काम संपवून निघत होती. निघता निघता तिने मागून आवाज दिला, “ताई मी आज छत्री विसरली आहे. मला एखादी छत्री देता का?” आणि या संपूर्ण रम्य वातावरणातून मी धाडकन खाली जमिनीवर पडले आणि डोळ्यांसमोर असंख्य काळे-पांढरे रंग साक्षात उभे राहिले!


चारच दिवस झाले असतील माझी छत्री हरवून... हरवलेल्या निळ्या रंगावर असंख्य काळे डाग पडलेली माझी छत्री सकाळीच योगा क्लासला जाऊन येताना भिजलेली म्हणून उघडून ठेवलेली होती. एकदा तिच्याकडे आणि एकदा त्या छत्रीकडे पाहिले आणि तिला म्हटले, “ही घेऊन जा. परत आणून दिली नाहीस तरी चालेल.” तर ती म्हणाली, “घरात दोन छत्र्या आहेत आमच्या झोपडी वजा घरात आणखी किती ठेवणार ताई? उद्या परत आणते. अडल्या-नडल्याला, अचानक पाऊस सुरू झाला, तर मला नेता येईल.” आणि खरोखरी दुसऱ्या दिवशी तिने प्रामाणिकपणे ती छत्री आणून घरात ठेवली.
तर गंमत अशी आहे की, ही छत्री मी साधारण पंधरा वर्षांपूर्वी विकत घेतली असावी. मला अजूनही आठवतेय की त्यावेळेस मी संस्कृत शिकायला दादरला जायचे. तो क्लास बंद होऊनही बराच काळ लोटला त्यामुळे अंदाजे पंधरा वर्षे तरी निश्चितच झाली असतील.


हा विषय चाललाच आहे, तर आणखी एक गोष्ट आठवतेय की माझ्या पर्समध्ये एक छत्री असतानाही केवळ रस्त्याच्या बाहेर अडकवलेल्या छत्र्यांमधून डोकावत मी या छत्रीकडे आकर्षित झाले होते. आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणाऱ्या या निळ्या छत्रीच्या प्रेमातच पडले आणि ही छत्री विकत घेतली. दादर म्हणजे कपडे, दागिन्यांपासून (अर्थात खोट्या) अनेक भाज्या-फळांपर्यंत अनेक गोष्टी विकत घेता घेता पिशवी जड झालेली असते, त्याच्यात एक छत्री असताना, दुसऱ्या छत्रीचे ओझे मी बाळगत होते; परंतु ती छत्री हातात असल्याचा आनंद मी तुम्हाला वर्णन करू शकत नाही. घरी आले आणि मुलीने विचारले, “अगं तुझ्याकडे आताच यावर्षी नवीन छत्री घेतलेली असताना, तू ही का घेतलीस?”, तर मी म्हटले, “आवडली म्हणून!” दोन-तीन दिवसांतच मुलीची छत्री हरवली आणि तिने मला छत्रीसाठी विचारले तेव्हा मी म्हटले, “दादरवरून आणलेली छत्री तुला आवडली आहे ना, घेऊन जा. दुसरी छत्री तर नवीनच आहे ना?” तिने ती त्या पावसाळ्यात थोडेफार दिवस वापरली असेल, पण माझी याच वर्षी खरेदी केलेली छत्री दरम्यान हरवली. (म्हणजे कोणी चोरली नाहीये.) माझाच वेंधळेपणा! मुलीने माझी छत्री मला परत केली आणि तिने बहुधा नवीन छत्री विकत घेतली असावी, आठवत नाही. असेच अनेक पावसाळे येत राहिले... जात राहिले. दरम्यानच्या काळात मी कमीत कमी सात ते आठ छत्र्या कधी आवडल्या म्हणून तर कधी गरज म्हणून विकत घेतल्या. माझी ही निळी आणि असंख्य काळे डाग पडलेली छत्री दिवसेंदिवस जुनी होत होती; परंतु कोणतीही नवीन छत्री घेतली आणि वापरायला सुरुवात केली की पंधरा दिवसांच्या आत ती हरवत होती आणि परतून मला पूर्ण पावसाळा माझीच ही छत्री वापरावी लागत होती. आज पंधरा वर्षांत माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, कोणतीही नवीन छत्री मला धार्जिन नाही. सारखा विचार करतेय की असे का घडते आहे, बरं? मला छत्री हरवायची सवय आहे तर मग ‘ही छत्री’ का माझ्याकडून हरवत नाही?


एकदा जवळच्याच बागेमध्ये संध्याकाळी फिरायला गेले. एका सिमेंटच्या कट्ट्यावर आईच्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या. मी त्यांना विचारलेत की ठेवू का छत्री? त्या म्हणाल्या की ठेव आणि निवांत फिर. मी त्यांच्या मागे असलेल्या एका खिळ्याला अडकवून ठेवली. दुसऱ्या दिवशी पाऊस पडलाच नाही त्यामुळे छत्रीची आठवण आली नाही पण तिसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये निघताना चक्क छत्री नसल्याचे आठवले. गंमत म्हणजे हेही आठवले की, परवा मी कुठे ठेवून विसरले आहे. स्वतःवरच खूश होऊन मी जाता जाता गाडी थांबवून त्या बागेत शिरले आणि ज्या जागी मी ठेवली होती तिथेच चक्क ती अडकलेली होती... जणू हरवलेले मूल रडकुंडे होऊन आईला शोधते त्याप्रमाणे ती जणू मला शोधत होती. माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी तिला छातीशी धरले.


काही माणसे देवावर विश्वास टाकतात. काही माणसे दैवावर विश्वास टाकतात त्याप्रमाणे मी विचार करतेय की, कदाचित ही छत्री माझ्यासाठी लाभदायक असेल आणि म्हणून ती माझ्यापासून टिकून आहे. युनिव्हर्स ती सातत्याने माझ्याकडे कशी राहील, याचा प्रयत्न करते आहे!


शेवटी काय समाधान हे मानण्यावरच असते ना! मग माझ्या या निळ्या जुन्या काळे डाग पडलेल्या छत्रीची कथा ऐकून तुम्हाला तुमच्या छत्र्यांच्या आणि मुख्य म्हणजे हरवलेल्या छत्र्यांच्या निश्चितपणे कथा पाठवून समाधान मिळेल की सगळीकडे माणसे सारखीच असतात, छत्र्या हरवणाऱ्या माणसासारखी नाही तर आपल्या काळजीने आपल्याजवळ सातत्याने राहू पाहणाऱ्या एखाद्या लकी छत्रीसारखी!


pratibha.saraph@ gmail.com


 











Comments
Add Comment

बाप्पा तोच, उत्सव नवा!

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर गणपती बाप्पा मोरया!” हा जयघोष कानावर पडला की मन आपोआप आनंदाने भरून येते.

छंद

कथा; रमेश तांबे विनय आणि त्याची बहीण विनया वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवत बसले होते. खरे तर ही दोन्ही भावंडे

या ध्वजाखाली या...

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर "या ध्वजाखाली या, सारे एकत्र या, भारतमातेच्या चरणी, कर्तव्याची शपथ

पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सारी मुले गप्पागोष्टींमध्ये रमत होती.“पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत?” अमोलने

लढाई

- कथा; रमेश तांबे एकदा एका जंगलात प्राण्या-पक्ष्यांची सभा भरली होती. सभेपुढचा गंभीर विषय होता या “माणूस”

मोफत

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव काही कमी होत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन