- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
सारी मुले गप्पागोष्टींमध्ये रमत होती.“पृथ्वीवर वाळवंट कसे निर्माण झालेत?” अमोलने प्रश्न केला.
शिवम म्हणाला, “जमीन ही खडकाळ, रेताड, मातकट, मुरमाड, काळीशार, नरम, कडक, दलदलीची वगैरे निरनिराळ्या प्रकारची असते. त्यानुसार जमिनीत ओलावाही वेगवेगळा असतो. ज्या जमिनीत ओलावा हा अत्यल्प असतो म्हणजे जवळपास नसतोच त्यास वाळवंट म्हणतात. वाळवंटात जिकडे तिकडे वाळूच वाळू असते म्हणूनही त्या भागाला वाळवंट म्हणतात. पाण्याचा तेथे लवलेशही नसतो. कधी कधी विशाल उंच पर्वत पाऊस आणणाऱ्या ढगांच्या वाटेत आडवे येतात. अशावेळी उंचावरच्या थंड हवेमुळे सर्व पाऊस त्या पर्वताच्या ढगांकडील भागातच पडतो आणि पर्वतापलीकडील सपाट प्रदेशात पाऊसच न पडल्याने तो भाग कोरडाच राहतो. प्रतिवर्षी नेहमीच असे घडत गेल्याने त्या भागात वाळवंट निर्माण होते.”
“मी असे ऐकले आहे की, वाळवंटात दिवसा जास्तच उष्ण व रात्री जास्तच थंड वाटते. ते खरे आहे का?” यात्रेकरूने विचारले.
“हो, ते खरे आहे.” शिवम सांगू लागला, “त्याचे कारण असे आहे की वाळवंटात जिकडे तिकडे सगळी वाळूच वाळू असते. सूर्याच्या उष्णतेने दिवसा वाळू खूप तापते. त्यामुळे दिवसा वाळवंटाचे तापमान खूप जास्त असते. म्हणून वाळवंट दिवसा जास्त उष्ण वाटते. जो पदार्थ जितका लवकर गरम होतो तो तितकाच लवकर थंडही होत असतो. त्यामुळे रात्री हीच वाळू लवकर व जास्त प्रमाणात थंड होते. त्यामुळे रात्री वाळवंटात जास्त थंडी वाजते.”
“वाळवंटात टेकड्या कशा काय बनतात मग?” विपुलने प्रश्न केला.
“वाळवंटात वाऱ्याबरोबर वाळू उडते व ती दुसऱ्या एखाद्या ठिकाणी साचते नि तेथे वाळूची टेकडी बनते.” शिवमने उत्तर दिले.
“मग पर्जन्यछाया म्हणजे काय असते?” विशालने विचारले.
“समुद्रावरून वाऱ्यासोबत वाहणारे पावसाचे ढग जेव्हा उंच डोंगराळ भागाकडे जातात तेव्हा त्या पर्वताने अडविल्यामुळे आणि उंचावरील थंड हवेमुळे त्या भागातच पाऊस पाडतात. जेव्हा हे ढग पर्वत ओलांडून पुढे जातात तेव्हा खाली उतरल्यामुळे व तापमान कमी असल्यामुळे ते पुन्हा हवेतील बाष्प पकडतात. त्यामुळे या भागात ढग दिसत असूनही पाऊसच पडत नाही म्हणून या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.” शिवमने सांगितले.
“बरे बर्मुडा त्रिकोणाविषयी तुला काही माहिती आहे का?” विशालने विचारले.
“आहे ना,” शिवम म्हणाला, “अटलांटिक महासागरात एक भयंकर त्रिकोणाकार भाग आहे. त्याला बर्मुडा त्रिकोण किंवा राक्षसी त्रिकोण असे म्हणतात. तेथे वाऱ्याचा वेग अतिशय जास्त असतो. त्यामुळे तेथे वारा चक्राकार वादळ बनतो. त्या चक्राकार वादळाने समुद्रावर विशाल लाटा उठतात. त्या लाटा त्या भागातून जाणाऱ्या जहाजांना गिळंकृत करतात. तसेच तेथे अचाट चुंबकीय शक्ती आहे. ती चुंबकीय शक्ती त्या भागावरील आकाशात वरून उडत जाणाऱ्या विमानांना त्या भागाकडे खूप जोराने खेचून घेते. त्यामुळे उडणारे विमान आपोआप अतिशय वेगाने खाली येते व क्षणभरात त्यात नाहिसे होते. म्हणजे त्यात काहीही जाता नष्ट होते. नंतर कशाचाच पत्ता लागत नाही. अशा ह्या घातकी बर्मुडा त्रिकोणाचे आकलन अजूनही अपुरे आहे.” “तुम्हाला तर खूप माहिती आहे मुलांनो. मलाही एवढी माहिती नव्हती.” यात्रेकरू बोलला व मुलेही खूश झालीत.