Tuesday, August 11, 2026

Baramati Crime : एमपीएससी करणाऱ्या तरुणीच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी बारामतीत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Baramati Crime : एमपीएससी करणाऱ्या तरुणीच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी बारामतीत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती : सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात अनेक तरुण-तरुणी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये येऊन जिद्दीने अभ्यास करतात. मात्र, याच शहरांमधील मैत्री आणि नात्यांचे अनेक काळे पैलू वेळोवेळी समोर येत असतात. अशीच एक अत्यंत संतापजनक, हळहळ लावणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना पुणे आणि बारामती परिसरातून समोर आली आहे. एमपीएससी परीक्षेची (MPSC Exam) तयारी करण्यासाठी पुण्यात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुण तरुणीचा गूढ आणि अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या प्रियकराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास, अन् प्रेमाची सुरुवात

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत तरुणीने आपले बी.एस्सी. ॲग्रीचे (B.Sc Agri) शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी आणि पुढील करिअर म्हणून एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ती ऑक्टोबर २०२५ मध्ये पुण्यात राहण्यासाठी गेली होती. पुण्यात वास्तव्यास असतानाच तिची ओळख बारामती येथील रहिवासी असलेल्या अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि भविष्यात विवाह करण्याचे त्यांनी ठरवले. दरम्यान, डिसेंबर महिन्यात या प्रेमप्रकरणाची कुणकुण तरुणीच्या मैत्रिणीमार्फत तिच्या कुटुंबियांना लागली. मुलीच्या नात्याबद्दल माहिती समजल्यानंतर आईने तिच्याशी सविस्तर संवाद साधला. ३० डिसेंबर रोजी आई आणि तिचा भाऊ थेट पुण्यात गेले आणि मुलीला समजावून सांगून बारामतीला आपल्या घरी घेऊन आले. त्यावेळी तरुणीने घरच्यांना स्पष्ट सांगितले की, तिचे अथर्ववर प्रेम असून तिला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. मुलीचा हट्ट आणि तिची इच्छा लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबीयांनी आपापसात चर्चा केली आणि या विवाहाला अधिकृत संमती दिली. त्यानंतर १२ एप्रिल रोजी दोन्ही कुटुंबीयांची औपचारिक भेटही पार पडली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक या नात्यात काळे ढग दाटू लागले.

लग्न ठरलं, पण तरुणीच्या वागण्यात अचानक बदल

कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिल्यानंतरही अथर्व आणि तरुणीची भेटणे आणि बोलणे सुरूच होते. फोनवरही त्यांच्यात नेहमी संपर्क होत असे. मात्र, लग्नाची तारीख जवळ येत असतानाच तरुणीच्या वागण्यात अचानक मोठे बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. ती पूर्वीसारखी मोकळेपणाने बोलत नव्हती. ती नेहमी शांत, तणावात आणि काहीशी अस्वस्थ दिसत होती. मुलीची ही बदललेली अवस्था पाहून आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर आईने विश्वासाने तिच्या मैत्रिणीकडे संपर्क साधून विचारपूस केली. मैत्रिणीकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीमुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकवली. मैत्रिणीने सांगितले की, अथर्व तिच्यावर सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत आहे. एवढेच नव्हे तर, तो तिला नको त्या काही गोळ्यांचे सेवन करण्यास देत असल्याचा दावाही आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकारामुळे तरुणी प्रचंड मानसिक दबावाखाली होती.

६ ऑगस्टचा तो घातवार दिवस आणि घटनाक्रम

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि काळीकुट्ट घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अथर्व आपल्या कारमधून त्या तरुणीला एमबीए प्रवेशाच्या महत्त्वाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज येथे घेऊन गेला होता. दुपारी चारच्या वाजेच्या सुमारास तरुणीने आपल्या आईला मोबाईलवर मेसेज करून कॉलेजच्या प्रवेश फीबाबतची माहिती दिली. तसेच, त्यावेळी अथर्वच्या आई आणि मावशीला त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात असल्याचेही तिने मेसेजमध्ये नमूद केले होते. मुलगी बाहेर असताना आईने तिच्याशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर तरुणी अथर्वसोबत त्याच्याच कारमध्ये बसलेली असल्याचे दिसून आली. मात्र, जसजशी संध्याकाळ जवळ आली, तसतसे तिच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ लागल्या. सुमारे संध्याकाळी सात वाजता आईने पुन्हा फोन केला, परंतु तरुणीने तो फोन उचलला नाही. त्यानंतर आईने थेट अथर्वच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला, तेव्हा तिचे मुलीशी बोलणे झाले.

आईला फोनवर सांगितलेली ती भयंकर माहिती

या संभाषणादरम्यान तरुणीने अत्यंत घाबरलेल्या आवाजात आईला सांगितले की, अथर्व तिला बळच आपल्या घरी घेऊन जात आहे. त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आहेत आणि त्यासाठी तो तिला पुन्हा कोणतीतरी गोळी देणार आहे, असे तिने रडत रडत आईला सांगितले. मुलीचे हे हादरवून टाकणारे बोलणे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने तिला तात्काळ अथर्वच्या घरी जाण्यास सक्त मनाई केली आणि कुठल्याही परिस्थितीत तातडीने सरळ आपल्या घरी परत येण्याचा आदेश दिला. आईचा सल्ला ऐकून रात्री नऊच्या सुमारास आईने पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्यासाठी मेसेज केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तरुणीने आपण जेवत असल्याचे उत्तर मेसेजमध्ये दिले. परंतु, त्यानंतर मात्र तरुणीच्या मोबाईलवरून कोणताही प्रतिसाद आला नाही किंवा तिचा संपर्क होऊ शकला नाही.

रुग्णालयात नेले, पण तोवर उशीर झाला होता

त्यानंतर अवघ्या काही वेळातच रात्री दहाच्या सुमारास आईने पुन्हा काळजीपोटी फोन केला. यावेळी अथर्वने फोन उचलला. त्याने मुलीला अचानक चक्कर आल्याचे सांगून आपण तिला उपचारासाठी घेऊन येत असल्याचे कळविले. काही वेळातच अथर्व त्या तरुणीला घेऊन थेट तिच्या आईच्या घरी पोहोचला. तिची प्रकृती अतिशय खालावलेली असल्याने तिला तात्काळ प्रथमोपचारासाठी देवकाते हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे तिला ताबडतोब गिरीराज हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आई रात्री सुमारे १०:२० वाजता घाईघाईने सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिला जी दृश्य दिसले त्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तरुणी स्ट्रेचरवर निपचित पडलेली होती आणि डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती आईला दिली. आपल्या तरुण मुलीचा असा अचानक आणि रहस्यमय मृत्यू झाल्यामुळे आईवर दुःखाचा डोंगर कोसळला.

आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल

मुलीचा अशा संशयास्पद आणि अचानक झालेल्या मृत्यूमुळे आईने या संपूर्ण प्रकरणामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी सविस्तर फिर्याद नोंदवण्यात आली. आईने केलेल्या तक्रारी आणि पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी प्रियकर अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा किंवा मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेने अतिशय वेगाने सुरू केला आहे. तरुणीच्या मृत्यूमागील नेमके वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण काय आहे? तिने घेतलेल्या त्या संशयास्पद गोळ्यांचा आणि तिच्या मृत्यूचा नक्की काय संबंध आहे? तसेच घटनेच्या दिवशी प्रत्यक्ष कारमध्ये आणि अथर्वच्या घरी नेमके काय घडले? या सर्व प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणातील आरोपांची खरी सत्यता शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

पोलीस प्रशासनाची भूमिका

या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने लक्ष घालून आहेत. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरेक्षक अजित पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा