Saturday, August 8, 2026

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच; "मेघालय भवन" विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच;
'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा संपन्न
नवी मुंबई : महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये आहेत, अशा शब्दांत गौरव उद्गार काढत महाराष्ट्र आणि मेघालय यांच्यातील सांस्कृतिक व आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खारघर येथील प्लॉट नंबर १४, सेक्टर १६ येथे आयोजित 'मेघालय सदन' च्या जमीन हस्तांतरण व भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड हा संपूर्ण परिसर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेला मोठी गती देणार असून, हाच परिसर भारताच्या विकासाचे पुढील मुख्य केंद्र ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्याप्रसंगी मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग, मेघालय राज्याचे सामान्य प्रशासन विभाग मंत्री सोस्थेनिस सोहतुन यांच्यासह खासदार मिलिंद देवरा, आमदार मंदाताई म्हात्रे,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, मेघालय राज्याचे मुख्य सचिव शकील अहमद, मेघालय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त व सचिव सिरिल व्ही. डी. डिएंगडोह, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सिडकोचे मुख्य महाव्यवस्थापक अश्विन मुद्गल, सिडकोचे सहव्यवस्थापक राजा दयानिधी, सिडकोचे सहव्यवस्थापक गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल प्रांतअधिकारी पवन चांडक, तहसिलदार मिनल भामरे,  तसेच मेघालय राज्यातील महाराष्ट्रात राहणारे विद्यार्थी आणि नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि मेघालय या दोन्ही राज्यांच्या राज्यगीताने या सोहळयाचा प्रारंभ करण्यात आला.  मेघालय राज्यातील जगप्रसिध्द पारंपारिक नृत्य शैलीत मेघालयीन कलाकरांनी सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के.संगमा यांच्याकडे मेघालय भवनसाठीच्या जमिनीची कागदपत्रे हस्तांतरित करण्यात आली. या सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही राज्यांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुबंधांवर प्रकाश टाकला. ईशान्य भारतातील विद्यार्थी, कलाकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांसाठी मुंबई व पुणे ही अत्यंत पसंतीची ठिकाणे आहेत. विशेषतः मेघालयच्या आत्म्यात वसलेल्या संगीताचा मुंबईच्या संगीत जगताशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यामुळेच खारघरसारख्या मोक्याच्या ठिकाणी आकारास येणारे हे मेघालय भवन केवळ एक इमारत नसून, मेघालयातून शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी किंवा कला सादरीकरणासाठी येणाऱ्या नागरीक व  विद्यार्थ्यांसाठी हक्काचे घर ठरेल.
नवी मुंबई परिसराच्या होत असलेल्या अभूतपूर्व विकासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सांगितले की, या भागात जागतिक दर्जाच्या 12अव्वल विद्यापीठांचा समावेश असणारी 'एज्यु-सिटी' आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची 'मेडी-सिटी' उभारली जात आहे. सोबतच देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता याच परिसरात निर्माण होत असून, हे क्षेत्र न्यू-एज आणि डीप-टेक उद्योगांचे केंद्र बनत आहे. पुढील 10 ते 15 वर्षांत जेव्हा मेघालयचे नागरिक या वास्तूचा वापर करतील, तेव्हा या नियोजित आणि भविष्याभिमुख जागेचे महत्त्व त्यांना अधिक स्पष्टपणे जाणवेल. मेघालय भवनाचे बांधकाम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट दर्जात पूर्ण करण्यासाठी सिडको किंवा राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी  दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मेघालयचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष कै. पी. ए. संगमा यांच्या संसदेतील अतुलनीय योगदानाचे भावूक स्मरण केले. अत्यंत खडतर राजकीय परिस्थितीतही चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांनी देशाची संसद कुशलतेने चालवली. त्यांचाच वारसा पुढे नेत मेघालयचे तरुण व गतिमान मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी गेल्या 6 ते 7 वर्षांत मेघालय राज्याची अर्थव्यवस्था दुप्पट केली आहे, अशा शब्दांत त्यांनी संगमा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. केवळ या भवनापुरते मर्यादित न राहता, येत्या काळात महाराष्ट्र आणि मेघालय हे दोन्ही राज्ये संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्याने अधिक वेगाने पुढे जातील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी  व्यक्त केला.
नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी 'मेघालय भवन'साठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको आणि स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांचे विशेष आभार मानले. मुंबईत उपचारासाठी येणारे रुग्ण, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची वाढती संख्या पाहता जुन्या मेघालय भवनमध्ये जागेची मोठी अडचण भासत होती. नीती आयोगाच्या बैठकीत संगमा यांनी विनंती करताच अवघ्या काही सेकंदांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमिनीचा प्रस्ताव मान्य केला. या उपक्रमाला त्यांनी पूर्व आणि पश्चिम भारताला जोडणारा आणि देशाच्या एकात्मतेला अधिक बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा मानला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच ईशान्य भारतातील राज्ये आज देशात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रासोबतचे जुने संबंध आठवत संगमा यांनी आगामी काळात व्यापार, कृषी आणि संस्कृतीच्या क्षेत्रात भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. विशेषतः मेघालयची जगप्रसिद्ध 'लाखडोंग हळद', क्रीडा क्षेत्र आणि तेथील समृद्ध संगीत परंपरा मुंबई व महाराष्ट्राच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, त्यांनी 'मेघालय भवन'चे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
नवी मुंबईतील 'मेघालय भवन'च्या भूखंड हस्तांतरण प्रसंगी प्रास्ताविक करताना मेघालय राज्याचे  मुख्य सचिव शकील अहमद यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन, सिडको आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानले. मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी येणारे रुग्ण, शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी हे मेघालय भवन अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. तसेच,महाराष्ट्राच्या सहकार्यामुळे मेघालय राज्याला आरोग्य, व्यापार आणि पर्यटनाच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग मिळतील, असे सांगत त्यांनी नव्याने लाभलेल्या खंबीर नेतृत्वामुळे मेघालय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरल्याचे अधोरेखित केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >