मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारा खोळंबा आणि तुफान गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन'तर्फे १० ऑगस्ट २०२६ पासून एक विशेष 'मिक्स्ड-लूप' सेवा सुरू केली जात आहे. या नव्या उपक्रमामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या अंधेरी ते घाटकोपर दरम्यान ट्रेनची वारंवारिता थेट ३ मिनिटांवर येणार असून, दररोज हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
काय आहे ही 'मिक्स्ड-लूप' सेवा ?
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका कार्यरत विंग कमांडरला संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती कथितरीत्या लीक केल्याच्या आरोपावरून दिल्ली ...
नव्या नियोजनानुसार, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा दोन भागांत विभागली जाईल. यात एक ट्रेन केवळ अंधेरी ते घाटकोपर या प्रवाशांची तुफान गर्दी असणाऱ्या टप्प्यात धावेल, तर तिच्या पाठोपाठ येणारी पुढील ट्रेन नेहमीप्रमाणे वर्सोवा ते घाटकोपर या संपूर्ण मार्गावर धावेल. यामुळे सर्वात जास्त प्रवासी रहदारी असलेल्या अंधेरी-घाटकोपर पट्ट्यात गाड्यांची उपलब्धता वाढेल. ही शॉर्ट-लूप सेवा सायंकाळी ६:२३ वाजता अंधेरीच्या डाउन प्लॅटफॉर्मवरून सुरू होईल आणि रात्री ८:२३ वाजेपर्यंत कार्यरत राहील.
प्रवाशांना मिळणारे प्रमुख फायदे
- अंधेरी ते घाटकोपर दरम्यान दोन गाड्यांमधील अंतर ३ मिनिटे २० सेकंदांवरून कमी होऊन अवघे ३ मिनिटे होईल. यामुळे मेट्रोची प्रवासी वहन क्षमता २० टक्क्यांनी वाढणार असून, दररोज तब्बल २८,००० अतिरिक्त प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल.
- आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत (Mon-Fri) धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या आता ४७६ वरून वाढून ४८४ होतील.
- मेट्रो मार्गिकेवरील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी अंधेरी ते घाटकोपर या टप्प्यातच प्रवास करतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा या अथांग गर्दीला होईल. वर्सोवा ते आझाद नगर दरम्यान या वेळेत ट्रेनचे अंतर सुमारे ३६२ सेकंद म्हणजेच ६ मिनिटांचे असेल.
पायाभूत सुविधांचा कार्यक्षम वापर
मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्यामंतक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करून प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर सेवा देणे हा या मिक्स्ड-लूप पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या प्रवासाच्या पॅटर्नचा सातत्याने अभ्यास केला जात असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आगामी काळातही असे ग्राहक-केंद्रित बदल केले जातील.






