अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच
मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या काळात मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील तब्बल १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. गतवर्षी १ लाख ५० हजार गोविंदांना हे कवच देण्यात आले होते; मात्र यंदा उत्सवाचा वाढता उत्साह आणि गोविंदा पथकांची वाढती संख्या विचारात घेऊन विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवाच्या दिवशी मानवी मनोरे रचताना दुर्दैवाने कोणताही अपघात घडल्यास गोविंदांना सर्वसमावेशक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. मानवी मनोरा कोसळून गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास, दोन्ही डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचे आर्थिक संरक्षण दिले जाईल. तसेच अपघातात एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपूर्ण अपंगत्व आल्यास विमा पॉलिसीतील निश्चित टक्केवारीनुसार मदत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मनोरे रचताना जखमी होणाऱ्या गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागल्यास प्रत्यक्ष उपचाराचा खर्च अथवा जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय कवच शासनाकडून दिले जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "महाराष्ट्रात उपजीविका करायची असेल, तर मराठी भाषेशी नाळ ...
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्तांवर मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पारदर्शक आणि विहित टेंडर पद्धतीचा अवलंब करून प्रति गोविंदा ७५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी हप्ता आकारणाऱ्या शासकीय विमा कंपनीची निवड करण्याचे निर्देश क्रीडा आयुक्तांना देण्यात आले आहेत. कंपनीची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागणारा आवश्यक निधी 'राज्य क्रीडा विकास निधी'मधून तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. निकष काय?
- विमा संरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ पात्र आणि गरजू गोविंदांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन' (अंधेरी, मुंबई) या संस्थेकडे नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
- प्रत्यक्ष दहीहंडीचा सराव आणि प्रशिक्षण घेणाऱ्या, न्यायालयाने निश्चित केलेली वयाची अट पूर्ण करणाऱ्या आणि उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या गोविंदांची काटेकोर तपासणी करून असोसिएशनला ही यादी क्रीडा आयुक्तांकडे सादर करावी लागेल.
- असोसिएशनकडून प्रमाणित करण्यात आलेल्या गोविंदांच्या अंतिम संख्येनुसारच सरकारमार्फत विमा हप्त्याची रक्कम संबंधित कंपनीला अदा केली जाईल.
परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे धमकीचा संदेश; पोलीस व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येनंतर ...
नियम व अटी
दरम्यान, या योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी शासनाने काही नियम व अटी लागू केल्या आहेत. हे विमा संरक्षण दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या अपघातांसाठीच लागू राहील. इतर कोणत्याही कारणास्तव घडलेली दुर्घटना किंवा अपघात या विम्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. याशिवाय गोविंदा पथकांना न्यायालयाने आखून दिलेल्या बाल गोविंदांच्या वयोमर्यादेच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असेल. दहीहंडी आयोजकांनी स्थानिक पोलीस, महापालिका आणि संबंधित प्रशासकीय प्राधिकरणांच्या सर्व आवश्यक परवानग्या घेणे व सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास आयोजकांनी स्थानिक पोलीस, प्रशासन आणि राज्य गोविंदा असोसिएशनला त्वरित अहवाल देणे बंधनकारक असणार आहे.





