Tuesday, August 4, 2026

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

Kalyan News : कल्याणमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार; रेबीजचे इंजेक्शन देताना चिमुरड्याच्या कमरेत अडकली तुटलेली सुई!

कल्याण: कल्याण पूर्व भागातून आरोग्याशी संबंधित एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अवघ्या अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना डॉक्टरांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे तुटलेली सुई थेट त्याच्या कमरेतच अडकून राहिल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत पालकांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.

कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या या चिमुरड्याला एका पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी त्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले. मात्र, इंजेक्शन देताना सुई तुटून मुलाच्या कमरेतच राहिल्याचे पालकांच्या लक्षात आले. जेव्हा आईने याबाबत विचारणा केली, तेव्हा सुई खाली पडली असेल असे थातुरमातुर सांगून डॉक्टरांनी त्यांना मुलाला घरी नेण्यास सांगितले.

घरी गेल्यानंतर मुलाला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो प्रचंड रडू लागला. घाबरलेल्या पालकांनी तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात धाव घेतली, जिथे उपचारास नकार मिळाल्यानंतर त्यांनी मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे एक्स-रे काढल्यानंतर सुई कमरेतच अडकल्याचे स्पष्ट झाले. अखेर तातडीने शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी मुलाच्या कमरेतून ती सुई बाहेर काढली.

या भयंकर प्रकारामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभारावर आणि वैद्यकीय सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अशा दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >