Tuesday, August 4, 2026

Annapurni Subramaniam : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना कॉस्पार विक्रम साराभाई पदक; हा मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

Annapurni Subramaniam : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना कॉस्पार विक्रम साराभाई पदक; हा मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

मुंबई : भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचे कॉस्पार विक्रम साराभाई पदक २०२६ प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे त्या हे पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि एकूण चौथ्या भारतीय ठरल्या आहेत. इटलीतील फ्लॉरेन्स येथे आयोजित ४६व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात सोमवारी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( Dr. Annapurni Subramaniam)

डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन या सध्या बंगळुरू येथील भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या (IIA) संचालक आहेत. त्यांच्याकडे नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस केंद्राच्या (CeNS) संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारीही आहे. तारे, तारकागुच्छ आणि जवळच्या आकाशगंगांवरील संशोधनासोबतच त्यांनी वैज्ञानिक उपकरणांच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भारताच्या पहिल्या अंतराळ-आधारित वेधशाळा मोहिमेतील अॅस्ट्रोसॅटच्या अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (UVIT) प्रकल्पात त्यांनी कॅलिब्रेशन शास्त्रज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच आंतरराष्ट्रीय थर्टी मीटर टेलिस्कोप (TMT) प्रकल्पातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

कॉस्पार विक्रम साराभाई पदक हे विकसनशील देशांतील अंतराळ संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिले जाते. हा पुरस्कार कॉस्पार आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ प्रदान केला जातो. ( Vikram Sarabhai Medal)

यापूर्वी हा सन्मान इस्रोचे माजी अध्यक्ष यू. आर. राव, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ गुरबक्ष सिंग लखिना आणि इस्रोचे शास्त्रज्ञ अनिल भारद्वाज यांना मिळाला आहे. २०२४ मध्ये भारत सरकारनेही डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांना 'विज्ञान श्री' राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराने गौरविले होते.

डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन यांचा हा सन्मान भारतीय विज्ञान आणि अंतराळ संशोधनासाठी अभिमानाची बाब मानला जात असून, विशेषतः महिला संशोधकांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >