Tuesday, August 4, 2026

Nashik Crime News : जादुटोणा करून पतीला ठार मारू ! त्र्यंबकेश्वरच्या ठगांनी महिलेला धमकावत दीड लाख लुटले

Nashik Crime News : जादुटोणा करून पतीला ठार मारू !  त्र्यंबकेश्वरच्या ठगांनी महिलेला धमकावत दीड लाख लुटले

Nashik Crime News : अंधश्रद्धेच्या विळख्यातून आजही अनेक लोक अडकून पडले आहे. अर्थात त्या लोकांना त्याचे परिणाम आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक त्रासातून भोगावे लागतात. देव कोपेल , विध्वंस करेल अशा भूलथापा देऊन अनेक श्रद्धाळू लोकांना ठगांनी ठगले आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. देव - देवतांच्या नावाने धमकावत आणि भीती दाखवून एका सर्वसामान्य गृहिणीला १ लाख ३७ हजार रुपयांना लुटण्यात आले.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील सागर जोशी व जिगर गजानन जोशी या दोन ठगांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. देव- देवतांच्या नावाने बीडमधील गृहिणीला धमकावून तिच्याकडून १ लाख ३७ हजार रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या फसवणुकीमुळे पीडितेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

पीडित महिला बीड शहरातील अंबिका चौक परिसरातील रहिवासी आहे. दीड महिन्यापूर्वी ‘श्री स्वामी समर्थ’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सागर जोशी आणि जिगर गजानन जोशी (रा. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्याशी तिची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांनी देव- देवतांशी संबंधित धार्मिक माहिती देऊन गृहिणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ७ जून रोजी २५१ रुपये आणि ८ जून रोजी ५ हजार ५५० रुपये गृहिणीने फोनपेद्वारे पाठवले. मात्र, त्यानंतर संशयितांनी अधिक पैशांची मागणी केली. गृहिणीने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी खरा चेहरा दाखवत धमक्या देण्यास सुरुवात केली. (Nashik Crime News)

...तर पतीला जिवे मारीन

‘पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर जादुटोणा करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुझ्या पतीला जिवे मारून टाकीन, अन् तुला भीक मागण्याची वेळ आणीन,’ अशी सतत भीती फोनवरून घातल्यामुळे गृहिणी प्रचंड घाबरली. या भीतीपोटी तिने ७ जून ते १६ जून २०२६दरम्यान टप्प्याटप्प्याने तब्बल १ लाख ३७ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या फोनपे नंबरवर व बँक खात्यांवर ऑनलाइन पाठवले. (Nashik Crime News)

गुन्हा दाखल

सततच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर गृहिणीने शिवाजीनगर पोलिस ठाणे (Shivajinagar Police Station) गाठून घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. यावरून सागर जोशी व जिगर गजानन जोशी (दोघे रा. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्याविरूद्ध फसवणूक व धमकावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >