पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत जलबोगदा उभारणीचा प्रस्ताव मंजूर
मुंबई : मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे (Sea Water) गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी २०० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा निः क्षारीकरण प्रकल्प बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या निःक्षारीकरण प्रकल्पामधील उत्पादित पाणी मनोरी येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनपासून महानगरपालिकेच्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मिसळण्यासाठी मनोरी ते चारकोप महापालिका उदयान व पुढे कांदिवली महावीर नगर दरम्यान जलबोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या जलबोगदा आणि पंपिंग स्टेशनच्या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मुंबईकरांना सध्या ४१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात असून मुंबईकरांची मागणी मात्र ४६०० दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांतील तूट भरून काढण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे पावसाच्या स्वरूपात व तीव्रतेत होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी व पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने, मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा निः क्षारीकरण प्रकल्प बांधण्याचे आणि भविष्यात ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पर्यंत क्षमता वाढविण्याच्या तरतुदीसह काम हाती घेतले आहे. प्रकल्पांतर्गत नव्याने बांधण्यात येणारा जलवाहिनी बोगदा तसेच पंपिंग स्टेशनचे बांधकाम ४०० दशलक्ष लिटर क्षमतेनुसार विकसित करण्यात येत आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पंपिंग स्टेशनमधील (Pumping Station) यांत्रिक व विद्युत यंत्रणेची तरतूद २०० दशलक्ष क्षमतेपुरती करण्यात आली आहे. परंतु जलप्रवाह विश्लेषण व स्मेक यांनी सादर केलेल्या इतर तपशीलास जल अभियंता खात्याची संमती घेण्यात आली आहे. त्यानुसार हाती घेण्यात येणारा जलबोगदा हा मनोरी ते चारकोप महापालिका उद्यान या दरम्यान ४.६३ कि.मी. व पुढे महापालिका उद्यान ते कांदिवली महावीर नगर पर्यंत २.५४५ कि.मी. असा एकूण ७.१७५ कि.मी. लांबीचा, २.५ मी. संपूर्ण व्यासाचा आहे.
स्थायी समिती अध्यक्षाने दिला इशारा मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) अनेक विभग तसेच खात्यांच्यावतीने ५ लाख ते ७५ लाख रुपयांच्या निधीमध्ये विविध ...
या निःक्षारीकरण प्रकल्पाचा संकल्पन व बांधकाम कालावधी ४८ महिने इतका आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे पाणी विद्यमान वितरण व्यवस्थेमध्ये वेळेत समाविष्ट करण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या जलवाहिनी बोगद्याचे बांधकाम त्याच कालावधीत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने, या बोगदा प्रकल्पाचा कालावधी ४५ महिने प्रस्तावित करण्यात आला आहे. याबाबत मागील बैठकीत सदस्यांअभावी हा प्रस्ताव राखून ठेवला होता. याबाबतचे सादरीकरण करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले होते.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका स्थायी समिती बैठकी पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.. यावेळी त्यांनी सर्व प्रकल्पांची मुद्देसूद माहिती देतानाच सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देत त्यांचे निरसन केले. यावेळी त्यांनी २०० दशलक्ष लिटर पाणी प्रथम दिले जात असले तरी त्यांची क्षमता अधिक २०० याप्रमाणे ४०० दशलक्ष लिटर असल्याने उर्वरीत २०० दशलक्ष लिटर पाणीही तात्काळ उपलब्ध करून देत सन २०२९ पर्यंत हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे,असे सांगितले.
दोन बोगदा खोदाई यंत्रे (टीबीएम) वापरून करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या मार्ग रेषेवर मनोरी, चारकोप महापालिका उद्यान व कांदिवली महावीर नगर अशा तीन ठिकाणी खोदकाम करून अर्थात कूपके बांधून त्या दरम्यान जमिनीपासून सुमारे १०४ ते १२८ मीटर खोलीवर, या दोन खोदाई यंत्राच्या सहाय्याने बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या साठी उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनवर १०० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती प्रणाली बसवण्यात येणार आहे. जेणेकरून मोठ्याप्रमाणात विद्युत वापरात बचत होणार आहे आणि पर्यायाने महापालिकेच्या निधीचीही बचत होईल असेही बांगर यांनी सांगितले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.




